महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला आणि दै. ॲग्रोवनला आज ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले.   

येथील विज्ञान भवनात आज तीस-या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,  केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 याप्रसंगी 11 श्रेणीत 57 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकविणा-या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वर‍ित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रकम प्रदान करण्यात आलेली आहे.

पश्चिम झोनमधील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिस-या क्रमांचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतेतील ज्येष्ठ समाज सेवक मधुकर गणपत डोईफोडे आणि प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी स्वीकारला.

सुर्डी या गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे.  सुर्डीमध्ये एकेकाळी दुष्काळाचे सावट होते मात्र, लोकसहभागातून 60 लाख रूपये एवढा निधी जमा करून, पाण्याच्या पातळी वाढविण्यासंदर्भात कामे केली गेली. याचा परिणाम गावाबाहेर गेलेले लोक पुन्हा परत आलेत. गावाची प्रगती पूर्वीपेक्षा अधिक आहे. गाव आता सदाहर‍ित आणि उत्पन्न वाढणारे झाले असल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.

उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतला दुस-या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगर पंचायत अध्यक्षा ममता बिपीन मोरे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्न‍िल महाकाळ  यांनी स्वीकाला. 

 दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्‍जीवन  मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण  केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगर पंचायत टँकरमुक्त झाले असल्याची प्रतिक्रिया श्रीमती ममता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर दिली.

उत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्था गैरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तर‍ित्या त‍िस-या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दशकांपासून कार्य करीत आहे. औरंगाबादच्या दक्ष‍िणेत असणा-या  चित्ते नदी खो-यामध्ये चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले. सुरूवातीला पीण्यासाठी, शेतीसाठी, पशुधनासाठी पाण्याचा अभाव होता. जनतेच्या सकात्मक प्रतिसादातून चित्ते नदी खो-यात ‘माथा ते पायथा’ असा शास्त्रीय, तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करून कम्पार्टमेंट बाँईडिंग, सीसीटी, नदीपासून 17 किलो मिटरवर 25 स‍िमेंट बंधारे बांधण्यात आले. नदीचे रूंदीकरणही करण्यात आले. नदीच्या कॅचमेंट परिसरातील 29 पैकी 12 पाझर तलावातील 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. 2 कोटी  40 लाखाचे काम लोकसहभागातून केलेले आहे. आता या भागातील भूजल पातळी 3 ते 4 मीटर वाढली असल्याचे, श्री शिरपूरे यांनी सांगितले.

मुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये ॲग्रोवन, सकाळ मिडीया प्रा. ली. या संस्थेला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ॲग्रोवन चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी स्वीकारला.

चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, ‘ॲग्रोवनच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षांपासून पाण्याच्या जन-जागृतीचे काम करीत आहोत. विशेषत: शेतक-यांसाठी हे दैनिक काम करते आहे. शेतक-यांच्या शेकडो यशकथा ॲग्रोवनने प्रकाशिक केल्या आहेत. यासोबतच शेतक-यांसाठी तालुकापातळीवर परिसंवाद, चर्चासत्रे आयोज‍ित केलेली आहेत. यासह सरपंच परिषदेच्या व्यासपीठावरून जन-जागृती केलेली आहे. याची दखल घेत आज पुरस्कार मिळाला असून अंत्यत आनंद होत आहे, हा पुरस्कार शेतक-यांना अर्पण करीत आहे ’, अशी प्रतिक्रिया यांनी चव्हाण दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web