नेशन न्यूज मराठी टीम.
जामनगर – गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदल एक सदैव युध्दसज्ज, विश्वासार्ह आणि एकसंध सशस्त्र दल म्हणून उदयाला आले आहे आणि हिंदी महासागर प्रदेशातील ‘सर्वाधिक पसंतीचा सुरक्षाविषयक भागीदार’ आहे असे भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सांगितले. गुजरातमधील जामनगर येथे आज 25 मार्च 2022 रोजी आयएनएस वालसुरा या जहाजाला राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) देऊन गौरविण्यात आले, त्या समारंभात राष्ट्रपती बोलत होते.
दीर्घकालीन दृष्टीकोनातून आवश्यक नियोजन लक्षात घेऊन आणि मोहिमांच्या विस्तारित कक्षांच्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने भारतीय नौदल त्यांच्या सामर्थ्यात सतत सुधारणा करत आहे याचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या अत्याधुनिक आणि प्रभावी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि संवेदके यांनी सुसज्ज आहेत. हे सर्व घटक म्हणजे नौदलाच्या महत्त्वाच्या क्षमता आहेत आणि नौदलाची लढाऊ पात्रता तसेच इतर परिचालनाचा अविभाज्य भाग आहेत असे ते म्हणाले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉयल भारतीय नौदलाच्या क्षमता वाढविण्यासाठी टॉर्पेडो अर्थात पाणतीर प्रशिक्षण केंद्र म्हणून आयएनएस वालुसराला नौदलाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले होते या वास्तवाकडे निर्देश करत राष्ट्रपती म्हणाले की गेल्या 79 वर्षांच्या काळात या केंद्राचे रुपांतर अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेत झाले आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, आयएनएस वालुसरा या जहाजाने शांतता काळात तसेच युद्धादरम्यान देशाप्रती रुजू केलेल्या अत्यंत अतुलनीय सेवेसाठी त्याला राष्ट्रपती ध्वज प्रदान करणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आयएनएस वालुसराला आज ज्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे त्यासोबत वाढीव जबाबदाऱ्या देखील आल्या आहे आणि या केंद्रातील सर्व अधिकारी, तसेच स्त्री-पुरुष कर्मचारी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत असे राष्ट्रपती म्हणाले