शहीद दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्‍ली- शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात, बीरभूम इथल्या हिंसक घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहून केली. हा निर्घृण अपराध करणाऱ्या गुन्हेगारांना राज्य सरकार कठोर शिक्षा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करेन, की असे निंदनीय कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना आणि अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्यांना कधीही क्षमा करु नका” असेही ते पुढे म्हणाले.

आजच्या शहीद दिनानिमित्त, हुताम्यांचे स्मरण करत, पंतप्रधान म्हणाले की भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाची गाथा आपल्या सर्वांनाच देशासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा देते. “आपल्या भूतकाळाचा वारसा आपल्या वर्तमानाला मार्गदर्शन करणारा आणि उत्तम भविष्याची उभारणी करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. म्हणूनच; आज आपला देश आपल्या इतिहासाकडे, आपल्या भूतकाळाकडे ऊर्जेचा एक जिवंत स्त्रोत म्हणून बघत आहे.”असे पंतप्रधान म्हणाले.

पूर्वी भारतातल्या प्राचीन वस्तू, मूर्ती, आपल्या समृद्ध कलाकुसरीच्या वस्तूंची सर्रास परदेशात तस्करी केली जात असे. आजचा नवा भारत मात्र, या सगळ्या वस्तू, आपला वारसा मायदेशी परत आणत आहे. 2014 पूर्वीच्या दशकात, केवळ डझनभर मूर्ती भारतात आणल्या गेल्या, मात्र, गेल्या सात वर्षात, ही संख्या 225 पर्यंत वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.  

‘निर्भीक सुभाष’ नंतर, कोलकात्याच्या समृद्ध वारशात बिप्लवी भारत गॅलरीच्या रूपाने आणखी एक नवा मोती जोडला गेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. बिप्लवी भारत गॅलरी, पश्चिम बंगालचा वारसा अधिकाधिक समृद्ध करण्याच्या, केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. विक्टोरिया मेमोरियल, आयकॉनिक गॅलरी, मेटकाफ हाऊस यांसारख्या वारसास्थळांच्या नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “आपल्या संस्कृतीची, नागरी सभ्यतेची ही प्रतीके, आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहोत,” अशी अपेक्षा व्यक्त करत या दिशेने देशात मोठे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

वारसास्थळांचे  पर्यटन वाढवण्यासाठी भारतात देशव्यापी मोहीम सुरू असल्याचं मोदी म्हणाले. स्वदेश दर्शन सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून वारसास्थळांच्या पर्यटनाला चालना दिली जात आहे, असे ते म्हणाले. दांडीयात्रा स्मारक, जालियनवाला स्मारकाचे नूतनीकरण, स्टॅच्यू ऑफ युनिटी, दीनदयाळ स्मारक, बाबासाहेब स्मारक, भगवान बिरसा मुंडा स्मारक, अयोध्या आणि काशी येथील घाटांचे सुशोभीकरण किंवा संपूर्ण भारतातील मंदिरांचे नूतनीकरण, यांसारख्या उपक्रमांसह  वारसा पर्यटन नवीन संधी खुल्या करत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, शतकानुशतके गुलामगिरीच्या काळात तीन शाखांनी  संयुक्तपणे स्वातंत्र्य मिळवून दिले.  या शाखा  क्रांती, सत्याग्रह आणि जनजागृतीच्या होत्या.  पंतप्रधानांनी  राष्ट्रीय ध्वज तिरंग्याच्या प्रतीकात्मकतेकडे  लक्ष वेधले. . ते म्हणाले की, हे तिन्ही घटक तिरंग्याच्या रंगात असून केशरी रंग  क्रांतिकारी प्रवाह, पांढरा सत्याग्रह आणि हिरवा देशाच्या सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रध्वजातील निळा रंग हा देशाच्या सांस्कृतिक जाणीवेचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांमध्ये आपण नव्या भारताचे भविष्य पाहतो, असे ते म्हणाले. केशरी रंग आपल्याला कर्तव्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रेरणा देतो, पांढरा रंग म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास  आहे; हिरवा रंग पर्यावरणाच्या संवर्धनासाठी  आहे आणि निळ्या चक्रात पंतप्रधानांना  देशाची निळी अर्थव्यवस्था दिसली आहे.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आझाद आणि खुदीराम बोस यांसारख्या क्रांतिकारकांच्या तरुण वयाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, भारतातील तरुणांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. “भारतातील तरुणांसाठी अशक्य असे   काहीही नाही. असे कोणतेही ध्येय नाही जे भारतातील तरुण साध्य करू शकत नाहीत,” असे ते म्हणाले

देशसेवेसाठी आणि देशप्रेमाच्या तळमळीने विविध प्रांत, भाषा, संसाधने एकत्र आलेल्या स्वातंत्र्यलढ्यातला  एकतेचा धागा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. “भारत भक्ती, भारताची एकता, अखंडता ही शाश्वत भावना आजही आपले सर्वोच्च प्राधान्य असायला हवी. . तुमची राजकीय विचारसरणी कोणतीही असो, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असाल, परंतु भारताच्या एकतेशी  आणि अखंडतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड हा भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असेल”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधान पुढे म्हणाले, “आपल्याला नवीन भारतात नवीन स्वप्न  घेऊन पुढे जायचे आहे. हे नवीन स्वप्न भारताचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्राचीन ओळख आणि भविष्यातील उन्नतीचे  आहे. यामध्ये कर्तव्याच्या भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.”

400 अब्ज डॉलर्स किंवा 30 लाख कोटी रुपयांच्या वस्तूंच्या  निर्यातीचा मैलाचा दगड  आज गाठल्याचा संदर्भ देत पंतप्रधान  म्हणाले , “भारताची वाढती निर्यात हे आपल्या उद्योग, आपले एमएसएमई, आपली उत्पादन क्षमता आणि आपल्या कृषी क्षेत्राच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.

या दालनामध्ये क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि ब्रिटीश वसाहत राजवटीला त्यांनी केलेला  सशस्त्र प्रतिकार दाखवण्यात आला आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात या पैलूला अनेकदा योग्य महत्व  दिले गेले नाही. या नवीन दालनाचा उद्देश 1947 पर्यंत घडलेल्या घटनांचे समग्र दर्शन घडवणे आणि क्रांतिकारकांनी बजावलेली  महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे  हा आहे.

क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी राजकीय आणि बौद्धिक पार्श्वभूमीचे वर्णन  बिप्लोबी भारत गॅलरीत आहे. . यात क्रांतिकारी चळवळीचा जन्म, क्रांतिकारक नेत्यांच्या महत्त्वपूर्ण संघटनांची स्थापना , चळवळीचा प्रसार, भारतीय राष्ट्रीय सैन्याची स्थापना , नौदल उठावाचे  योगदान,आदी गोष्टी दाखवल्या आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web