नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई– बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडाभवनाच्या संचालक मंडळाने सन 2014 मध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यावेळचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. खेळाडू तसेच सभासदांच्या खेळावर परिणाम होऊ नये म्हणून महानगरपालिका आयुक्तांच्या मान्यतेने तेथे सन 2015 पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या क्रीडाभवनावर सहाय्यक आयुक्त हे प्रशासक असून या प्रशासकाची कारकीर्द संपुष्टात आणून निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
क्रीडाभवनाकरिता असलेल्या नियमावलीमध्ये काही बदल करून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या नियमावलीनुसार संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत प्रस्ताव महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला असून सदर प्रस्ताव विधी समितीकडे मंजुरीकरिता प्रलंबित असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
क्रीडाभवनाच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत संचालक मंडळाच्या मुख्य सचिव, क्रिकेट सचिव, जिमखाना सचिव यांच्याविरूद्ध खात्यांतर्गत चौकशी सुरू असून पदाधिकाऱ्यांना शिक्षाही देण्यात आल्या असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
यासंदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, सुनिल शिंदे, जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.