होळीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची कारवाई, गोवा दारुसह ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर – धुलिवंदनासाठी आणलेली गोवा राज्याची दारु जप्त करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावेळी 76 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर 18 मार्च रोजी पहाटे गस्ती दरम्यान एका कंटेनरमधून गोवा राज्याच्या विदेशी दारुच्या 890 पेट्या जप्त करुन एकूण 75 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. होळी सणानिमित्य धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी मद्याची मागणी लक्षात घेता गोवा राज्यातून दारुची अवैधरीत्या वाहतूक होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली होती. सदर पथकाकडून कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कडक पहारा लावून गस्त घालण्यात येत होती.

दिनांक 18 मार्च रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे व दुय्यम निरिक्षक ब २ अंकुश आवताडे यांच्या पथकाने जत सांगोला महामार्गावर सोनंद गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत असतांना एका आयशर कंपनीच्या सहाचाकी कंटेनर क्र. MH 04 GR 7237 मधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारुच्या एकूण 890 पेट्या जप्त केल्या. सदर वाहनात एड्रीयल क्लासिक व्हिस्किच्या 750 मिली क्षमतेचे 300 पेट्या, रोयल स्टॅग विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 100 पेट्या, इंपेरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 232 पेट्या, मॅक्डॉवेल नं 1 व्हिस्की विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 258 पेट्या असा 66 लाख 76 हजार रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला. तसेच 2 जुने वापरते मोबाईल व कंटेनर असा एकूण 76 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केला. कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले, वय 31 वर्षे, रा. पोखरापूर ता. मोहोळ याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालका सह इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी दिली…..

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web