केडीएमसी क्षेत्रात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हटवा,मनसे आ.राजू पाटील यांची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कोरोना आटोक्यात आल्याने राज्य शासनाने मुंबई शहर-उपनगर, पुणे- रायगड सह १४ जिल्ह्यातील निर्बंध ४ मार्च पासून शिथिल केले आहेत. त्याच धर्तीवर कोरोनाचा कमी झालेला आलेख लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली मधील निर्बंध देखील हटवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांची भेट देखील घेतली.

राज्य शासनाने  ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून मुंबई सह अन्य जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तेथील सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम, सभागृह किंवा मैदानाच्या १०० टक्के क्षमतेने घेण्यास या निर्णयाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. त्याच बरोबर लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारांना लावण्यात आलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करताना पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ९० टक्केपेक्षा अधिक प्रमाण, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण ७० टक्के पेक्षा जास्त, पॉझिटिव्हीटी रेट १० टक्केपेक्षा कमी, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात भरलेले असणे असे निकष लावण्यात आले आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यांचा विचार करण्यात आला आहे.

 मात्र उपरोक्त नियमांचा फटका ठाणे जिल्ह्याला सर्वात जास्त बसला आहे. डोंबिवली, कल्याण शहरे मुंबई लगत असताना व नियमात बसून सुध्दा निबंध शिथिल करण्यात आले नाहीत. या दोन्ही शहरांमध्ये लसीकरण योग्य झालेले आहे. वास्तविक डोंबिवली हे सांस्कृतिक व शैक्षणिक शहर मानले जाते. दरवर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विविध ठिकाणी निघणाऱ्या शोभा यात्रांची सुरुवात डोंबिवलीमध्येच झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर डोंबिवलीकर शोभायात्रा काढण्यासाठी उत्सुक होते. परंतु निर्बधांमुळे परवानगी नसल्याने डोंबिवलीकरांमध्ये नाराजी पसरली आहे.

त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नियम न लावता या दोन्ही शहरांमध्ये सवलत देण्याची आवश्यकता आहे अस मत मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्ह्याधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांच्या समोर मांडलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना देखील केडीएमसी कडे दुर्लक्ष होत असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या आहेत.

कोरोना नियम शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर हे देखील अनुकूल असून लवकरच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची कोरोना निर्बंधांमधून सुटका केली जाणार आहे. त्यामुळे आता शासन हे निर्बंध कधी हटवत हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web