राष्ट्रीय लोक अदालतीत साडे पंधरा लाखापेक्षा अधिक प्रकरणे निकाली,वाहतूक विभागाला ६९ कोटींहून अधिक महसूल

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १५.५० लाखापेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून वाहतूक विभागाला ६९ कोटी पेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळाला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १४८७ पॅनल ठेवण्यात आलेली होती. या पॅनलसमोर ६५ लाखापेक्षा जास्त दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ६९ लाख प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी सायंकाळ पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे १५ लाखापेक्षा जास्त वाद दाखलपूर्व प्रकरणे, ५० लाखापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ७२ हजार ४८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

महाराष्ट्रातील वाहतूक विभागाची ट्रॅफीक ई-चलानची ६० लाखापेक्षा जास्त प्रकरणे वाद दाखलपूर्व स्वरुपात राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १४ लाखापेक्षा जास्त प्रकरणे तडजोड होऊन निकाली निघाली व त्यामधून वाहतूक विभागाला ६९ कोटीपेक्षा अधिकचा महसूल प्राप्त झाला. या सर्व ३६ लाख प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना ऑनलाईन नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.

यामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकाचे वसुलीचे दावे कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याचे खटले, बीज कंपन्यांनी दाखल केलेले खटले वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपन्या यांची रक्कम वसूली प्रकरणे व पोलीसाची वाहतूक चलनाबाबतची प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती.

सोलापूर न्यायालयामध्ये २६ वर्षापासून प्रलंबित दिवाणी दावा आणि ५० वर्षांपासून फौजदारी दावा तडजोडीने निकाली

सोलापूर न्यायालय येथे २६ वर्षापासून प्रलंबित असलेला दिवाणी दावा आणि ५० वर्षांपेक्षा अधिक वर्षापासून प्रलंबित असलेला फौजदारी दावा राष्ट्रीय लोक अदालतीचे पॅनल सदस्य व वकील यांच्या प्रयत्नांतून तडजोडीने निकाली निघाला. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या समतीने लेखी तडजोड नोंद केली जाते व त्याआधारे अॅवार्ड पारीत केला जातो. तो अॅवार्ड हा अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरूप प्राप्त होते. त्या अॅवार्डन्या विरुध्द अपीलाची तरतूद नाही.
मा. न्यायमूर्ती अमजद सय्यद, कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, संभाजी शिंदे, अध्यक्ष, उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांनी नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथे भेट देऊन राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनलवरील सदस्यांशी आणि उपस्थित असलेल्या पक्षकारासोबत संवाद साधला. तसेच आभासी पध्दतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनलला भेट दिली.
मा. न्यायमूर्ती उदय ललित, कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, अशोक जैन, सदस्य सचिव राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी आभासी पध्दतीच्या तंत्रज्ञानाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथील पॅनलवरील सदस्य आणि पक्षकार यांच्याशी संवाद साधला. पुढील राष्ट्रीय लोक अदालत ही ७ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web