नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली– कथक नृत्यांगणा सायली अगावणे, सर्प मित्र वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार या  राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार  विजेत्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला  सदिच्छा भेट दिली. पुरस्कार ही कामाची  पावती  मानून आप-आपल्या क्षेत्रात समाजासाठी  उत्तमोत्तम कार्य करण्याचा मनोदय या तिन्ही पुरस्कार  विजेत्यांनी  यावेळी  व्यक्त केला.

 सायली अगावणे यांना दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळा सुरु करायची आहे. वनिता बोराडे यांना पर्यावरण रक्षणासाठी सापांचे रक्षण व्हावे म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध उपक्रम राबवायचे आहेत, तर  कमल कुंभार यांना वर्षाकाठी ९ हजार महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण दयायचे आहे.   

राष्ट्रपती  रामनाथ  कोविंद  यांच्या  हस्ते  या तिघींना आज मानाच्या नारीशक्ती  पुरस्काराने  गौरविण्यात आले, या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात आमंत्रित करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी या तिन्ही पुरस्कार विजेत्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचे  कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या अनौपचारिक चर्चेत या तिघिंनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली.

 पुणे  येथील सायली अगावणे डाऊनसिंड्रोमग्रस्त असून त्यांनी अपंगत्वावर मात करत कथक  नृत्यांगणा म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ९ व्या वर्षापासूनच कथकचे धडे गिरवायला सुरुवात केली. या नृत्यात पारंगत होत त्यांनी राज्यासह दिल्ली, कटक तसेच परदेशात कोलंबो, बँकॉक, सिंगापुर आणि लंडन येथे नृत्य सादर केले आहे. कथक सोबतच वेस्टर्न डान्सचेही वेगवेगळे प्रकार सायलीने आत्मसात केले आहेत.१२ नृत्यप्रकार आत्मसात करून प्रत्येक नृत्याचे २० असे एकूण २४० स्टेज प्रोग्राम त्यांनी सादर केले आहेत. कोरोना काळातही योगा, कथकसह १२ नृत्यांचा सराव आणि स्केटिंग व पेंटिंग या आवडी जपल्याचेही सायलीने सांगितले. स्केटींग डान्सर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सायलीला आपल्या  सारख्या  दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळाही  सुरु करायची आहे.

 बुलढाणा जिल्हयातील मेहकर तालुक्यातील बोथा येथील वनिता बोराडे यांना वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आल. डोंगराळ भागात वास्तव्य असल्याने आजुबाजूला वन्यजीवांचा सतत वावर असायचा. यातूनच पुढे साप पकडण्याचा छंद जडला. माहेरी या छंदाला काही जुन्या रुढी व समजामुळे विरोध झाला. मात्र, लग्नानंतर पतीने प्रोत्साहन दिले व पुढे पहिल्या सर्प मित्र म्हणून आपल्या नावाची नोंद झाल्याचे वनिता बोराडे सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून ५१ हजार सापांना पकडून वनविभागाच्या माध्यमातून सुरक्षित जंगलामध्ये सोडल्याचे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवले. गैरसमजामुळे सापांना मारण्याचा प्रघात पाहून याविषयी समाज प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. श्रीमती बोराडे यांच्या सर्प संरक्षण कार्याची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद घेण्यात आली आहे. विविध पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले असून येत्या काळात ‘सोयरे वनचरे’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्प रक्षणासह पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी  व्यक्त केला. 

 उस्मानाबाद जिल्हयातील हिंगळजवाडी येथील कमल कुंभार या उद्योजिका असून  पशुपालन क्षेत्रात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून महिला बचतगट,बांगळया विकण्याचा व्यवसाय,आशा कार्यकर्ता, ऊर्जासखी असा प्रवास करत कमल कुंभार यांनी उद्योजिका म्हणून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणून येणाऱ्या अडचणी व त्यावर यशस्वीपणे मात करण्याच्या त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आज त्या हजारो महिलांना प्रशिक्षण देत आहेत. सद्या त्या शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडूळखत, घोडेपालन, सेंद्रीय पालेभाज्या हे व्यवसाय सांभाळतात. त्यांनी आतापर्यंत २० हजार महिलांना शेतीपूरक व्यवसाय  प्रशिक्षण दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना काळातही  गेल्या दोन वर्षात त्यांनी ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले असून यातील ३ हजार महिलांनी स्वत:चे शेतीपूरक व्यवसाय थाटले आहेत. येत्याकाळात वर्षाकाठी ९ हजार  महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.

 या तिन्ही  पुरस्कार विजेत्यांना  माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा विकास’ ही पुस्तिकाही  भेट स्वरुपात देण्यात आली. सायली अगावणे यांनी यावेळी कार्यालयाच्या ग्रंथालयासाठी  आई मनिषा अगावणे लिखित ‘अमेझींग चाईल्ड सायली’( एक सत्य कथा) हे पुस्तक  भेट दिले. सायलीची  बहीण  जुईली यावेळी उपस्थित होती. वनिता बोराडे आणि त्यांचे पती डी भास्कर यांनी यावेळी ‘सोयरे वनचरे’ या संस्थेची दिनदर्शिका भेट स्वरूपात दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web