नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – देशामध्ये असणाऱ्या विविध समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात असून संविधानाने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याची परखड टिका महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कल्याणात केली. कल्याणातील अग्रामनांकित बिर्ला महाविद्यालय आणि गांधी अध्ययन केंद्रातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा शिबिरात बोलताना तुषार गांधी यांनी हे मत व्यक्त केले.
गेल्या 75 वर्षांत आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातील नव्हे तर दुस्वप्नातील भारत असून त्यांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. 75 वर्षे उलटूनही नागरिकांमध्ये एकता नाही तर विषमता आहे, विवाद आहेत. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जी तळमळ आणि जाणीव असली ती आपल्याला अजिबात दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 75 वर्षांनंतरही पूर्वीच्याच समस्या कायम असून त्यांनी आधीपेक्षा अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आपल्याकडून हिरावून घेतले जात असून समाजामध्ये विषमता एवढी जास्त प्रभावशाली आणि प्रचंड स्वरूपात असून बेरोजगारी, शिक्षणाचा घसरलेला स्तर आदी मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसारखे उपक्रम सतत राबविले जात असल्याची टिका तुषार गांधी यांनी यावेळी केली.
तर कोविड काळात पहिल्या लॉकडाऊन दरम्यान असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने लाखो कामगारांनी शहरांकडून गावाकडे स्थलांतर केले. तेच लोकं आज परिस्थिती सामान्य होऊ लागल्यावर गावात रोजगार नसल्याने पुन्हा एकदा शहराकडे वळत आहेत. आजच्या घडीला ज्यांच्याकडे रोजगार आहेत त्यांच्याकडे स्वतःच घर नाहीये आणि ज्यांच्याकडे स्वतःचे घर आहे त्यांच्याकडे रोजगार नाहीये, ही 75 वर्षातील स्वातंत्र्याची सर्वात मोठी विटंबना असल्याचा घणाघातही गांधी यांनी यावेळी केला.
तर सध्याच्या शिक्षण व्यवस्थेने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही गुलाम करून ठेवले आहे. एमबीबीएस, इंजिनिअरिंग करूनही जॉब नसेल आणि आपले पंतप्रधान त्यांना पकोडे तळायचे सल्ले देत असतील तर मग माझ्या वयाची 15 -17 वर्षे मी शिक्षण करण्यात का वाया घालवू असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत ब्रिटिशांनी लागू केलेली शिक्षण पद्धती मुळापासून बदलण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी बी.के. बिर्ला फाउंडेशनचे संचालक प्रो.सुरेश ऋतुपर्ण, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, गांधी स्टडी सेंटर डॉ. अर्चना सिंह, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, वरिष्ठ उपप्राचार्य सपना समेळ, हिंदी भाषा विभागाचे एस.एस. पांडेय आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान बिर्ला महाविद्यालयात पुढील 5 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय युवा शिबिरात महाराष्ट्रासह देशभरातील 14 राज्यांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये पूर्वोत्तरच्या मणीपुर, आसाममधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.