अवैध वाळू उपसा विरोधात कारवाईसाठी जात असताना मंडळाधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड – अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये मंडळ अधिकारी जागीच ठार झाले, तर तहसीलदार गंभीर जखमी झाले. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर रविवारी पहाटे घडली. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार डोके हे अपघातात जखमी झाले आहेत. नितीन जाधव हे बीड जिल्हा महसूल मंडळाचे सचिव म्हणून काम बघायचे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते बीड वासियांना चांगलेच परिचित होते.

नितीन जाधव यांच अपघाती निधन झाल्याची बातमी कळताच बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली. सुरुवातीला पोलीस दलात काम करणार्‍या नितीन जाधव यांनी महसूल विभागात नोकरी पत्करली. सुरुवातीपासूनच खो-खो खेळात अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीन यांची ओळख बीडकरानां होती. मागच्या काही दिवसांपासून गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी आणि सिंदफणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे तिकडे महसूल विभागात दुसरीकडे पोलिस या वाळू माफियांविरुद्ध कारवाई करताना पाहायला मिळत होते.

हा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथक स्थापन केले आहेत. दरम्यान बीडचे प्रभारी तहसीलदार डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी रात्री गस्त घालत होते. दरम्यान आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तहसीलदार व मंडळ अधिकारी बसलेल्या गाडीचा सावळेश्वर फाटा या ठिकाणी अपघात झाला.

गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली गाडी रस्त्याची खाली जाऊन झाडाला धडकली. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web