युक्रेन मध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी सुखरूप आपल्या मायदेशी

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई- एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई)  युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.

यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत आहे. मुंबईत  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपूर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे  वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र  शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्यांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे.  सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच व्हॉट्सॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in  या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web