पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कर्मचारी सतत कार्यरत आहेत. ‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘अतिथी देवो भव’ हे ब्रीद उराशी बाळगून पर्यटक निवासात साफसफाई, दुरूस्ती आणि सॅनिटायझेशनची कामे योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करण्यात आली आहेत. या प्रशिक्षणासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एमटीडीसी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्यामध्ये करार करण्यात आला असून महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरूण कर्मचारी (शेफ) यांचा मेळ साधत त्यांना आदरातिथ्य आणि खानपानाबाबतचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे निवास व्यवस्था. ही बाब लक्षात घेऊन पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना केल्याने पर्यटकांना आपली निवासे आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात एमटीडीसी यशस्वी झाले आहे. यापुर्वीही लॉकडाऊन कालावधीत पर्यटक कमी असल्याने एमटीडीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज यांच्या संकल्पनेनुसार महामंडळाचे अनुभवी कर्मचारी आणि तरूण कर्मचारी (शेफ) यांचा मेळ साधत आता नव्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी या प्रशिक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावली आहे. यानुसार प्राचार्या डॉ.अनिता मुदलीयार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या दोन आठवड्याच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत 60 हून अधिक कर्मचाऱ्यांना फूड अँड बेव्हरेजेस आणि फूड प्रोडक्शन याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येत आहे.

एमटीडीसीने राज्यातील विविध रिसॉर्टवर रेस्टॉरंटची सुविधा दिली आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे खानपानाबरोबरच पर्यटकांना आनंद देणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचाही समावेश प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी महामंडळाला त्याचा उपयोग होणार आहे.

पर्यटनाच्या वैविध्यपूर्ण संधी आणि तेथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांमुळे आगामी काळात पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी एमटीडीसीने कंबर कसली असून आगामी काळात महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सोयी आणि सवलतींबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.mtdc.co या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन एमटीडीसीच्या पुणे कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web