महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – महिला आयोग महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रयत्न करते. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कायदे आहेत. महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी महिला आयोग नेहमीच महिलांच्या पाठीशी असतो, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी केले.

लैंगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने  यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पोलीस महासंचालक संजय पांडे, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते.

हिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याद्वारे महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला बचतगट मोहिमेचे बळकटीकरण करणे व महिला बचत गट भवन निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच येणार असून

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे ध्येय आहे. नोकरी, व्यवसाय करणारी स्त्री स्वत:च्या पायावर उभी असते मात्र ग्रामीण महिला तसेच गृहिणींनाही आर्थिक समस्या भेडसावतात. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभी राहिलेली बचत गटांची चळवळ निश्चितच महिलांना संघटित होऊन आर्थिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. समाजामध्ये सकारात्मक बाबी घडत असतानाच काही विकृतीदेखील दिसून येतात. बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, ॲसिड हल्ला अशा घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस दल नेहमी तत्पर असते. मात्र, समाज म्हणून आपण सर्वांनी अशा घटनांबाबत चिंतन केले पाहिजे, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. एकल महिलांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना ओळखपत्र यासारख्या विविध मागण्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग यांना निधी द्यावा. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2020 ते 2030 ही दहा वर्ष ‘डिकेड ऑफ ॲक्शन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासासाठी कृती करायची आहे. महिलांना त्यांचे प्रश्न कुठे मांडायचे याची माहिती झाली पाहिजे. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह असले पाहिजे. राज्य महिला आयोगाने समुपदेशन केंद्र सुरू करावे, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात समाजकारणात व राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. पूर्वीच्या काळी महिलांना समान अधिकार मिळत नव्हते. कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होते. जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती दिली.

या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री 155209 क्रमांकाचे तसेच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठीचा हा टोल फ्री क्रमांक लवकरच कार्यान्वित होणार असल्याची  माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमास महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा  श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर, महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव अ.ना. त्रिपाठी,तसेच महिला आयोगाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर आभार दीपा ठाकूर यांनी मानले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web