केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड

नेशन न्यूज मराठी टीम.

सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार (अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅनिंग २०२०-२१) स्पर्धेत महाराष्ट्रातून सोलापूर जिल्हयाच्या कौशल्य विकास कृती आराखडयाची निवड झालेली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आराखड्याचे ऑनलाईन सादरीकरण केले होते.

सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मनुष्यबळाची मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय नैसर्गिक संसाधने तथा साधनसामग्री इत्यादीच्या आधारे जिल्हयातील रोजगार/स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन सोलापूर जिल्हयाचा वार्षिक कौशल्य कृती आराखडा तयार करण्यात आला होता. बुधवारी झालेल्या अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅनिंग २०२०-२१ या स्पर्धेत जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी या आराखडयाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेत देशभरातील केवळ ३० जिल्हयांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाची निवड ही अभिमानास्पद बाब आहे.

या कृती आराखड्यामुळे जिल्हयातील कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार,स्वयंरोजगार संधींना चालना मिळणार आहे. स्थानिक तरुणांना या कृती आराखड्याचा निश्चितच उपयोग होईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web