महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण,टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

मुरबाड – वीजबिल थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून सहायक अभियंत्याला धक्काबुक्की व मारहाण तर जनमित्रांना दमदाटी केल्याची संतापजनक घटना ओजिवले येथे घडली आहे. यासंदर्भात‍ टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक धर्मा चौधरी आणि अमित अशोक चौधरी (राहणार ओजिवले, ता. मुरबाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. धसई शाखेचे सहायक अभियंता अतुल कोनोटे यांच्या निर्देशानुसार वीजबिल थकित असलेल्या चौधरीचा वीजपुरवठा रविवारी (१६ जानेवारी) दुपारी वीज कर्मचाऱ्यांनी खंडित केला. यावर चौधरी पिता-पुत्राने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या दोन नियमित जनमित्र व दोन कंत्राटी कामगारांना रोखून धरत दमदाटी केली. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी सहायक अभियंता कानोटे यांना ओजिवले येथे घटनास्थळी बोलावून घेतले. कानोटे हे घटनास्थळी पोहचताच अमित चौधरीने वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल हुज्जत घातली तर अशोक चौधरी याने कानोटे यांना मारहाण केली. कानोटे यांच्या फिर्यादीवरून टोकावडे पोलिसांनी चौधरी पिता-पुत्राविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web