बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी व दिनदर्शिका २०२२ प्रकाशित

नेशन न्युज मराठी टीम.

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित सन २०२२ च्या मराठी ‘नागरी दैनंदिनी २०२२’ (Civic Diary – 2022) आणि ‘दिनदर्शिका २०२२’ चे प्रकाशन मुंबईच्‍या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात आज (दि. ३० डिसेंबर २०२१) करण्यात आले.बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२२ ही माहितीने परिपूर्ण तसेच उपयुक्त आहे. सन २०२२ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती या दिनदर्शिकेमध्ये देण्यात आली आहे.

या प्रकाशन प्रसंगी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष यशवंत जाधव, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, नगरसेवक अनिल पाटणकर, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तर जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे आणि महानगरपालिका मुद्रणालयाच्या अधीक्षक अर्चना संघर्ष गांगुर्डे आदी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते

नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकाकरिता मार्गदर्शन करणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, दिनदर्शिकेची संकल्पना मांडणारे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, प्रकाशक तथा जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, उप जनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक, उप जनसंपर्क अधिकारी मिलिंद बाफना, प्रशासकीय अधिकारी अशोक बेंडकोळी यांच्यासह जनसंपर्क खात्यातील.गणेश गोसावी, जनार्धन कांबळे, छायाचित्रकार धि‍रज निपुर्ते, उपयोजित चित्रकार विष्णू शेलार यांच्यासह सुंदर छपाईबद्दल मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर व त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे या प्रसंगी महापौरांनी नमूद केले.

मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणा-या सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकारी, विभाग यांचे संपर्काचे अद्ययावत तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महानगरपालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून ‘नागरी दैनंदिनी’ (सिव्हिक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६४ वे वर्ष आहे.

यावर्षीच्या नागरी दैनंदिनीमध्ये मुंबईचे महापौर, उप महापौर तसेच महानगरपालिका सदस्य यांचे प्रभागनिहाय, पक्षनिहाय नावे समावेश करण्यात आली आहेत. तसेच निवासस्थानांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, मुंबईतील सन्माननीय खासदार, सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि इतर पालिका अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. महानगरपालिका पुरवित असलेल्या विविध नागरी सेवा- सुविधांची माहितीदेखील दैनंदिनीमध्ये समाविष्ट आहे. तसेच महत्त्वाचे नागरी संपर्क क्रमांक, सार्वजनिक सुट्टय़ा, नागरी प्रशासनाची माहिती अशी विविध उपयुक्त माहिती व महानगरपालिकेशी निगडित छायाचित्रेही या दैनंदिनीत आहेत.
यंदाच्या नागरी दिनदर्शिकेमध्ये महानगरपालिकेच्या विविध प्रकल्प कामांशी संबंधित छायाचित्रे व संकल्पचित्रे यांचा समावेश असून, त्याबाबतची अत्यंत संक्षिप्त माहितीदेखील दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर नमूद करण्यात आली आहे. नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेची संकल्पना, आरेखन (Desing), छायाचित्रण हे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. तर नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण हे महानगरपालिकेच्याच भायखळा येथील मुद्रणालयात करण्यात आले आहे. यानुसार सदर दोन्ही प्रकाशनांसाठीची सर्व कार्यवाही ही महानगरपालिकेच्या अंतर्गत स्तरावर करण्यात आली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web