कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी; २२ ठिकाणी पार्किंग तर २६० बसेसची व्यवस्था

नेशन न्युज मराठी टीम.

पुणे– कोरेगावनजिक पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची शासनस्तरावरुन नियोजन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

जयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे  थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) मार्फत नियोजन सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बार्टी, समाज कल्याण आयुक्तालय, महावितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडून आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून ५ सुसज्ज रुग्णवाहिका  व  १५ इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर  व १ जानेवारी रोजी २६० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गात बदल

चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.

अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावराफाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जडवाहने खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापुर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे  न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी जातील.

सोलापुर रस्त्यावरून आळंदी-चाकण भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो ट्रक) ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे अहमदनगर येथे जातील.

आळंदी- शेलपिंपळगाव बहुळ साबळेवाडी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणारी येणारी दोन्ही बाजूकडील सार्वजनिक तसेच  खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक बदल

नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जावू शकतील.

देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने  येणारी वाहने  सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न सोडता सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर महामर्गाने सरळ वाकडनाका, चांदणी चौकातून इच्छीत स्थळी जावू शकतील.

मुंबईकडून एक्स्प्रेस महामार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई बेंगलोर महामार्गाने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) वाकडनाका व राधा चौक येथून पुणेकडे जावू शकतील.

मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्याकडे न जाता उर्से  टोल नाका  येथून देहूरोडकडे जाणारा बाह्यवळण रोडने जावू शकतील.

नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी नाशिकफाटा मार्गे पुणे शहरकडे जावू शकतील. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web