कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणातील अबोली रिक्षा चालक महिलानी प्रशासकीय यंत्रणानाकडे कल्याण ,डोंबिवली स्टेशन पूर्व पश्चिम परिसरात स्वतंत्र रिक्षा स्टँन्ड अबोली रिक्षासाठी मागणी केली होती. जेणे करून अबोली रिक्षाने प्रवास करू इच्छुक महिला प्रवाशांना सोयीचे होईल, त्याच बरोबर महिला रिक्षा चालकांनाही व्यवसाय करणे सोयीचे होईल. या संदर्भात पाठपुरावा करीत असताना . प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा अबोली रिक्क्षा चालक महिलांचे म्हणणे आहे. महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना २०१७ मध्ये अबोली रिक्षा परवाना देण्यास सुरुवात केली, त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात आजमितीस कल्याण डोंबिवली मध्ये सुमारे ३० ते ३५ अबोली रिक्षा आहेत. मात्र महिला रिक्षा चालकांना स्वतःचा रिक्षा स्टँड प्रतीक्षेत आहे.
अबोली रिक्षा सुरुवात करतांना मोठा गाजावाजा केला होता, कल्याण डोंबिवली शहरात शेकडो अबोली रिक्षा फिरताना दिसतील व महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल अश्या वल्गना शासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधी यांनी केल्या होत्या, मात्र शासन व अधिकारी यांनी अबोली रिक्षा चालकांना प्रोत्साहन दिले नसल्याने अबोली रिक्षा ची संख्या वाढली नाही, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण डोंबिबली शहरात पूर्व व पश्चिम विभागात अबोली रिक्षा चालकांनी कायमस्वरूपी रिक्षा स्थानक मिळण्यासाठी प्रशासन कडे मागणी केली होती ती आजूनही पूर्ण झालेली नाही.
कल्याण डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशी घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्यास एक ते दीड तास वाट पहात, रांगेतील रिक्षा धकलावी लागते, त्यामुळे थकवा येतो, त्याच प्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे हवा तसा मोबदला मिळत नाही, त्यातच प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामामुळे स्टेशन परिसरातुन भाडे घेणे जिकीरीचे झाले आहे. अशातच घराची सर्व कामे करून रिक्षा चालवावी लागत असल्यामुळे धंदा कमी झाल्यास परवडत नाही,रिक्षाचे बँकेचे हफ्ते फेडणे घर खर्चाचा ताळमेळ कसा बसणार असा सवाल महिला रिक्षा चालक करत आहेत.
कोरोनापार्श्वभुमी मुळे बिघडलेली अर्थिक गणितातून कसे बाहेर पडायचे असा प्रश्न महिला रिक्षा चालक शारदा ओव्हळ आणि त्यांच्या सहकारी महिला रिक्षा चालकांना पडला आहे. अबोली रिक्षा चालकांसाठी स्टँड राखीव ठेवल्यास महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. यासाठी स्टँड आरक्षित ठेवावा अशी मागणी अबोली रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी पालिका प्रशासन, आरटीओ व वाहतूक पोलिसांकडे केली आहे. यानिमित्ताने अबोली रिक्क्षा स्टँन्डचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे. “कल्याण परिवहन उपप्रादेशिक आधिकारी तानजी चव्हाण यांच्या शी संपर्क साधला असता अबोली रिक्क्षा स्टँन्ड संदर्भात वाहतूक शाखेशी समन्वय साधून मार्ग काढू असे सागितले आहे.