ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने सोळा कि.मी चा पायी प्रवास करत केले लसीकरण

ठाणे/प्रतिनिधी – एका बाजूने पसरलेला सह्याद्रीचा डोंगर, माती-दगड गोट्यांची खडतर पाऊलवाट आणि आजूबाजूने वेढलेल्या घनदाट झाडा-झुडपातून तब्बल सोळा किलोमीटरचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कोविड १९ नियंत्रण लसीकरण पथक सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दापूरमाळ गावात बुधवारी पोहोचलं. गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन पात्र असणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे लसीकरण केले. शिवाय प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणीही केली. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय टीम केलेल्या धाडसी आणि अतुल्य कार्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी संपूर्ण टीमचे कौतूक केले.

शहापूर तालुक्यातील कसारा भागातील विहीगाव उपकेंद्रातर्गत दापूरमाळ गाव वसले आहे. येथे कोणत्याही स्वरुपात दळणवळणाची सोय नाही. त्यामुळे येथील नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल भोरे यांच्यासह नामदेव फर्डे, बाळू नीचिते, सुजाता भोईर, भारती ठाकरे , श्रीमती झुगरे , श्रीमती खोरगडे यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले. या गावाची एकूण लोकसंख्या २४६ असून कोविड १९ लसीकरणासाठी एकूण १३८ लाभार्थी होते. यामध्ये दोन गरोदर माता आणि तीन स्तनदा मातांचाही समावेश होता. या सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतर आरोग्य पथकाने येथे आरोग्य शिबीरही घेतले.

आरोग्य शिबीर अंतर्गत बालरोग , गरोदर माता , स्तनदा माता ,त्वचा रोग तपासणी केली. आवश्यक असणाऱ्याना औषधी देऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागात करोना महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येक गावासह वाडी, पाडे, तांडे, वस्त्यांवर लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिदुर्गम भाग जरी असला तरीही त्या भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग नियोजन करत आहे. ग्रामीण भागातील शंभर टक्के लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करणे , करोनाची भीती कमी करून लोकांमध्ये जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web