शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात १५ ऑगस्ट २०२१ ते २६ जानेवारी २०२२ यादरम्यान ७५ विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी केले आहे.

नुकतेच “आझादी ७५” या उत्सवाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. “भारतातील घटनात्मकता (Constitutionalism in India) या विषयावर संबोधित करताना माजी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी म्हणाले, राज्यघटना ही संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांचे फलित आहे. भारताचा पाया रचण्यात संविधान सभेची आणि घटनात्मकतेची २१ व्या शतकातील भूमिका, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता इत्यादी मुलभूत संविधानिक संकल्पना स्पष्ट करुन ते म्हणाले की, महान भारतीय राज्यघटनेसाठी आपण पात्र आहोत हे आपल्या कृतीतून आपल्याला सिद्ध करावे लागेल. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्या प्रत्येकाला ते खरे वंदन असेल, असेही श्री.धर्माधिकारी यांनी सांगितले. संविधान सभेची स्थापना, कार्ये आणि कार्यप्रणाली त्यांनी अतिशय सरळसोप्या शब्दांत विशद केली.

शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, राज्यघटनेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करेल. स्वत:चे कर्तव्य बजावण्यावर लक्ष द्यायला हवे. एक नागरिक आणि व्यक्ती म्हणून मी माझ्या देशाला काय देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. रुता वैती यांनी ‘आझादी ७५’ या उत्सवाची संकल्पना विशद करुन  मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाद्वारे आयोजित उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत पंधरा राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार, पंधरा तज्ज्ञ व्याख्यानमाला, पंधरा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा, पंधरा घटनात्मक हक्क आणि कर्तव्ये यावर पथनाट्य आणि विविध ठिकाणी कायदेशीर जागृती शिबिरे असे एकूण ७५ शैक्षणिक उपक्रम असतील. मुंबई आणि मुंबईजवळील पंधरा कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये, विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य आणि सर्व नागरिकांसाठी जागरूकता कार्यक्रम याअंतर्गत घेतले जातील.

प्रमुख पाहुणे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, शासकीय विधी महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती गौतम पटेल, महाधिवक्ता ॲड.आशुतोष कुंभकोणी, सदस्य रफीक दादा,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे यांच्यासह कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आदींनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

‘आझादी -७५’ च्या अंतर्गत शासकीय विधी महाविद्यालयाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘अधिकार प्रेरित न्यायशास्त्राकडून कर्तव्यावर आधारित न्यायशास्त्राकडे स्थलांतरण-काळाची गरज’, ‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रतिबंधात्मक अटकेचे कायदे’, ‘भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेचे विविध पैलू’, ‘भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत उच्च न्यायालयाच्या रिट अधिकार क्षेत्राचे विश्लेषण’, ‘भारतीय न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाची कारणमीमांसा’ अशा विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र / वेबिनार, यांसारख्या कार्यक्रमांची मालिका आयोजित केली. भारतीय संविधानातील विविध संकल्पनांच्या जागृतीवर चार राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या. ‘आझादी ७५’ या अंतर्गत पुढील उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

विधी महाविद्यालय आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि समाजाला त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमांच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. सर्व कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंचभाई, डॉ. अस्वार, प्रा. देसले, प्रा. टेंभुर्णीकर, डॉ. शिरसकर आणि प्रा. वैती हे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडीत आहेत. आतापर्यंत झालेले सर्व सेमिनार / वेबिनार youtube उपलब्ध आहेत. तसेच येणाऱ्या काळात होणारे सर्व कार्यक्रमही उपलब्ध असतील. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ . अस्मिता वैद्य यांनी केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web