कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कार्यालय परिसरात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एजंटने मारहाण केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी कल्याण आरटीओ कार्यलयात घडली होती. याच्या निषेधार्थ आज आरटीओ कर्मचाऱ्यांनी दिवसभर लेखनी बंद आंदोलन करत संबंधित एजंटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आरटीओ कार्यालय परिसरात थुंकण्यास मज्जाव केला म्हणून आरटीओ एजंट मच्छिंद्र केणेने लिपिक मनिष जाधवला मारहाण केल्याचा प्रकार काल संध्याकाळी घडला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी आरटीओ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.