आगरी समाज विज्ञाननिष्ठ असावा- प्रा. डॉ. सुरेश तुकाराम मढवी

डोंबिवली/प्रतिनिधी – मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर आदी जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र म्हणून आगरी समाजाचे महत्व मोठे आहे. पूर्वापार हा आगरी समाज पारंपरिक धार्मिक चालीरीतीशी निगडित असून तो त्या व्यवस्थेशी घट्ट रूतून आहे. आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची जिद्द असल्याने ” आगरी समाज आणि त्याची आर्थिक, सामाजिक स्थिती” या विषयावर प्रबंध करून त्याबाबतचा विस्तृत अभ्यास गेली सहा वर्षे केला. त्यामध्ये यशस्वी झालो आणि त्या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी मिळवली आहे. या अभ्यासक्रमात कळून आले की, आगरी समाज विज्ञाननिष्ठ असावा असे प्रतिपादन “आर्थिक आणि सामाजिक अभ्यास आगरी समाजाचा” या विषयावर डॉक्टरेट मिळविलेल्या प्रा. डॉ. सुरेश तुकाराम मढवी यांनी उंबर्लि ग्रामस्थांनी गौरव सोहळा निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केले.

डोंबिवली जवळील उंबर्लि गावातील ग्रामस्थ प्रा. सुरेश तुकाराम मढवी यासनी नुकतीच डॉक्टरेट पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आगरी समाज या विषयावर प्रथमच प्रबंध तयार करून यामध्ये डॉक्टरेट मिळावली आहे. या त्यांच्या खडतर प्रयत्नांना यशस्वीतेची झालर प्राप्त झाल्याकारनाणे उंबर्लि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यासाठी उंबर्लि गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवर त्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित होते. यामध्ये आमदार राजू पाटील, माजीमंत्री जगन्नाथ पाटील तसेच वारकरी संप्रदायची संत मंडळींनी मढवी यांचे कौतुक केले. यावेळी यथासांग मिरवणूक काढून ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत महिलांनी पंचारती करीत मढवी यांनी प्रथमच केलेल्या “आगरी” भाषेवर डॉक्टरेटचे कौतुक केले.

दरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना गौरवमूर्ती तथा सध्या अग्रवाल महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे प्रा. डॉ. मढवी म्हणाले, मला उंबर्लि गावाबद्दल उदात्त प्रेम असून या गावातून लहानाचा मोठा झालो याचा अभिमान आहे. लहानपणापासून काहीतरी वेगळे पण ठोस करावे अशी महत्वाकांक्षा पूर्वीपासून होती. नांदेड येथील रामानंद विद्यापीठ माध्यमातून “आर्थिक व सामाजिक अभ्यास आगरी समाजाचा” या विषयावर प्रबंध केला. यासाठी नांदेडचे डॉ. के.के. पाटील यांचे सहकार्य मिळाले. आगरी समाजाचा अभ्यास करतांना जास्त प्रमाणात लेखी मजकूर अभ्यासासाठी मिळाला नाही पण समाजातील जेष्ठ तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्तींकडून मौखिक पध्दतीने माहिती गोळा केली होती त्याचा खूप फायदा झाला. हा प्रबंध पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. यासाठी 10 तालुके, 10 गावे आणि त्यातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत समाजाच्या चालीरीती, सण-उत्सव, पारंपरिक गाणी आणि मागील इतिहास याची माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे समाजाचे सामाजिक प्रश्न, शैक्षणिक गांभीर्य यावर लक्ष केंद्रित करून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला. यामध्ये यशस्वी झालो याचा आनंद होत आहे. माझ्या या डॉक्टरेट पदवीचा उपयोग पुढील पिढीसाठी कसा होईल याची दक्षता घेणार आहे. परंतु समाजातील प्रत्येकाची श्रध्दा आपापल्या कामावर असावी अशी इच्छा आहे. विशेष म्हणजे अभ्यास करतांना समाजाच्या मागासलेपणाची कारणे शोधून त्यातून निष्पन्न झाले की समाज विज्ञाननिष्ठ असावा. माझा प्रबंध कॉपीराईट करणार असून त्याचे पुस्तकही प्रकाशित करणार आहे. आमचं गांव खूप लहान आहे पण संस्कारमय आहे. माझ्यावर किर्तनकारांचे चांगले संस्कार आले. लहानपणापासून मी संत सावळाराम महाराज यांच्या कीर्तनाचा चहाता आहे. प्रा.डॉ. सुरेश तुकाराम मढवी यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी ग्रामस्थ सुखदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web