पालघर/प्रतिनिधी – पुण्याच्या खेळाडूंनी स्पारिंग गटात आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १०९ गुणासह विजेतेपद पटकावले तर मुंबईच्या संघाने ९४ गुणासह स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. सांगली संघास ३५ गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. तर पुमसे स्पर्धेत मुंबईने विजेतेपद तर यजमान पालघरने उपविजेतेपद पटकावले. मुंबईच्या संघाने स्पारिंग आणि पुमसे या दोन्हीमध्ये आघाडी घेत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावून राज्य स्पर्धेवर आपले नाव कोरले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ३३ व्या स्पारिंग व ९ व्या पुमसे राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन पालघर विरार येथे करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातून ७५० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेते आगामी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, स्पर्धेचे आयोजक आणि पालघर अध्यक्ष अजील चाको, तायक्वांदो उपाध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, मिलिंद पाठारे, तांत्रिक कमिटीचे भास्कर करकेरा, प्रविण बोरसे, सुभाष पाटील, गप्पार पठाण, सुरेश चौधरी, दुलीचंद मेश्राम, वेंकटेश कररा तसेच आयोजन समिती राजा मकवाना, प्रसाद घाडी, परेश राऊत, नवीन दवे, योगेश जोशी, दिव्या मकवाना व आदी मान्यवर उपस्थितीत होते.

तायक्वांदो इंडिया अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संपन्न झालेली पहिलीच स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमूळे राज्यातील तायक्वांदोला नवी संजीवनी मिळणार असून तायक्वांदो खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी स्पर्धेची व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला आहे. पुढील स्पर्धा ही अशाच हायटेक कशा होतील याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार असून खेळासाठीं एकत्र येऊन तायक्वांदो खेळा ला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया महासचिव संदीप ओंबासे यांनी दिली.