मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल दाखल

ठाणे/प्रतिनिधी – मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.

1 ऑक्टोबर 2020 रोजी स्थापना करण्यात आलेल्या मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. आधी पोलीस मुख्यालयाची इमारत आणि आता पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना वाहने देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून निधी मंजूर करून देण्यात आला. याच निधीतून 14 बोलेरो जीप आणि 17 मोटारसायकल खरेदी करून त्या पोलिसांना आज सुपूर्त करण्यात आल्या.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता इथे घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली होती. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गस्त घालण्यासाठी पोलिसांनी वाहनांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून गाडी आणि मोटारसायकल घेण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आज या गाड्यांचे वितरण करतानाच या वाहनांमुळे पोलिसांना अधिक कार्यक्षमतेने आपले कर्तव्य पार पाडता येईल’ असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच मीरा-भाईंदर पोलिसांच्या कामाचा आढावा देखील पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी घेतला. त्यानंतर या भागातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढील टप्प्यात अधिकची वाहने देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आपली मागणी नोंदवण्याची सुचना त्यांनी मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना केली.

यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे, मीरा-भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, मीरा-भाईंदर आणि वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मीरा भाईंदर परिमंडळ दोनचे उपायुक्त अमित काळे आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओमायक्रोन व्हेरीयंटचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कर्नाटक राज्यात ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील सतर्क झाले असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना आपल्या हद्दीतील कोरोना केंद्रांचे फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट करून घेण्याचा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्हेंटिलेटर्सची तपासणी करण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. याशिवाय परदेशातून या मनपा हद्दीत येणाऱ्या रुग्णांना वेळीच अलगीकरण करून त्यांची कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे नमुने जिओ सिक्वेन्सिंग लॅब मध्ये पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्य सरकारने घालून दिलेले कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले असल्याचे देखील पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web