सात महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा उलगडा,मोलकरणीचा नवरा निघाला चोरटा

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने 7 महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. मालकाच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या नवऱ्याने तेथेच चोरी करून 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या चोरट्याकडून चोरलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात क्राईम ब्रँचला यश आले आहे.
हितेश शांतीलाल छेडा उर्फ जैन (36) असे या चोरट्याचे नाव असून तो डोंबिवली जवळच्या देसलेपाड्यातील नवनीत नगरमध्ये राहणारा आहे. या चोरट्याला स्थानिक मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
याच नवनीत नगरमध्ये राहणारे हितेन हरीश गोगरी (37) यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात 21 एप्रिल रोजी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. हितेन यांच्या घरातून 11 तोळे वजनाचे 4 लाख 80 हजार 446 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने कुणीतरी अज्ञात इसमाने घरफोडी चोरी करून नेले. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर, फौजदार नवनाथ कवडे, जमादार संजय माळी, हवा. विश्वास माने, सचिन साळवी, अनुप कामत, महेश साबळे, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे राहुल ईशी आणि ज्योत्स्ना कुंभारे या पथकाने घर मालकाशी संबंधित विविध सशंयीत मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषन सुरू केले.
हितेन गोगरी यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीचा नवरा हितेश छेडा उर्फ जैन याने कथन केलेल्या आतापर्यंतच्या हकिगती व तांत्रिक विश्लेषण यामध्ये विसंगती आढळून आल्या. त्यामुळे त्याच्यावर अधिक सशंय बळावला होता. या पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. हितेन गोगरी यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीचा नवरा हितेश छेडा उर्फ जैन यानेच ही चोरी केल्याची खात्री पटताच क्राईम ब्रँचने त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web