कल्याणात जनजागरण यात्रा काढून कॉग्रेसने केला केंद्र सरकारचा निषेध

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आगामी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने आता रणधुमाळीला वेग आला आहे.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दौऱ्याना सुरुवात झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जनजागरण यात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.केंद्र सरकारच्या विरोधात कल्याणात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जनजगारण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सांगितले की कल्याण डोंबिवली महत्वाची महापालिका असून काँग्रेस पक्ष इकडे सत्तेमध्ये नाही. मात्र आगामी केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर महापालिकेतील भ्रष्टाचारी व्यवस्था संपवणार असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.कल्याण डोंबिवली हे सर्वात चांगले शहर बनवणे, लोकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, इथला केडीएमसीतील भ्रष्टाचार संपवणे आदी गोष्टी काँग्रेस केडीएमसीमध्ये निवडून आल्यावर करेल असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या एक वर्षापासून शेतकरी देशाच्या सीमेवर उपोषणाला बसले होते. मात्र त्यांच्याशी बोलायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नव्हता आणि अचानक सकाळी एकाएकी जागे होत काळे कायदे मागे घेतले. मात्र त्यासाठी ते सांगत असणारे कारण आणि उभे करत असणारे चित्र वेगळे असल्याची टिका नाना पटोले यांनी यावेळी केली येत्या काळात उत्तरप्रदेश, पंजाबसह काही राज्यात निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीत लोकं आता भाजपला मतदान करणार नाहीत हे त्यांना समजून चुकले आहे. या राज्यात भाजप संपले तर पुढच्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजप विचारांचा राष्ट्रपती होणार नाही या काळजी आणि प्रचितीपोटी हे कृषी कायदे मागे घेतल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.
तर हे लोकं खोटं बोलून सत्तेत आले आहेत. हे आत्मघाती लोक असून त्यांच्यावर कोणाचा विश्वास ठेवत नसल्याने ते आपलीच पाठ थोपवून घेत असल्याचा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला.

दरम्यान कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक ते बैल बाजार परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत नाना पटोले हिरीरीने सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ, महागाई आदी धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सचिव ब्रिज दत्त, संतोष केणे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, शकील खान यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web