गावाकडील मालमत्ता वादातून केलेल्या हत्येचा उलगडा,मारेकऱ्याला झारखंड मधून मानपाडा पोलिसांनी केली अटक

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – गावाकडील मालमत्तेच्या वादातून गोळवलीत केलेल्या हत्येचा उलगडा करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने एका खुन्याला झारखंडमध्ये जाऊन ताब्यात घेतले. मात्र या हत्येशी संबंधित अन्य एकजण हाती लागला नसून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत.
कालुकुमार सिताराम महतो (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावातल्या दर्शन पाटील चाळीजवळ एक इसम जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून पोलिस ठाण्यात देण्यात आली. सपोनिरी ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता, एक इसम रस्त्यावर रक्तबंभाळ बेशुध्दावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यास दुखापत झालेली होती. सदर इसमाला पोलिसांनी लागलीच हॉस्पीटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर इसमास झालेल्या जखमा गंभीर स्वरुपाच्या असून त्या कशाने तरी मारल्याने झालेल्या असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि अविनाश वनवे व सपोनि ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन स्थानिक लोकांकडे विचारपुस करुन जखमीची ओळख पटवली.

त्यावेळी जखमीचे नाव पुरण सिकंदर महतो (47, रा. गोळवली गाव, मुळ रा. झारखंड राज्य) असल्याचे समजले. पोलिसांनी जखमी पुरणच्या संबंधित त्याच्या गावाकडील राहणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान पोलिसांना जखमी पुरणच्या गावाकडील एकाने दिलेल्या माहितीनुसार पुरण व त्याचे चुलत भाऊ हे गोळवलीमध्ये वेगवेगळे राहतात. त्यांच्यात गावाकडील संपत्तीवरून वाद असून त्याबाबत त्यांच्यावर जीवघेणी हाणामारी केल्याप्रकरणी गावाकडील पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.
बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री चुलत भावांनी पुरणला जेवण करण्यासाठी घरी बोलावले. तेथे त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर गावाकडील संपत्तीच्या वादातून त्याच्याशी भांडण उकरून काढले. त्यानंतर दोघा चुलत भावांनी मिळून त्याला जबर मारहाण तर केलीच, शिवाय त्याच्या डोक्यात दगड घालून दोघांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत पुरणला मुंबईतील सायन हॉस्पीटलमध्ये हलवले. तेथे त्याचा उपचारादरम्यान सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
पोलिसांनी भादंवि 302 चे वाढीव कलम लावून तपास सुरू केला. या हत्येशी संबंधित कालूकुमार आणि त्याचा भाऊ लालूकुमार सिताराम महंतो यांचा सर्वोतोपरी शोध घेण्यात येत होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपींचा म्हारळ, शहाड, सुरत, अंकलेश्वर, भरूच, भुसावळ या ठिकाणी पथके पाठवून शोध घेतला. परंतु हल्लेखोर त्यांच्या मुळगावी झारखंड राज्यात पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली.
आरोपी त्यांच्या गावाकडे पळाल्याची माहिती कळताच सपोनि अविनाश वणवे यांच्यासह राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, विजय कोळी, प्रवीण किनरे, भारत कांदळकर यांनी झारखंडमध्ये जाऊन शोध मोहीम सुरू केली. आरोपी त्यांच्या मुळगांवातच लपल्याची माहिती कळताच या पथकाने स्थानिक पोलिसांच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या मुळगांवाकडे धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच गावकरी प्रक्षुब्ध झाले. आरोपीला सोबत घेऊन जाण्यास विरोध करण्यासाठी या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. परंतु गावकऱ्यांच्या विरोधास न जुमानता पोलिसांनी आरोपी कालूकुमार महंतो यास ताब्यात घेतले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web