कल्याणच्या गिर्यारोहकांनी पहिने सुळक्यावर फडकवला तिरंगा

कल्याण/प्रतिनिधी – सह्याद्रीच्या खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत मोडणाऱ्या सुळक्यांची संख्या ही अनेक आहे. त्यातीलचं एक म्हणजे “पहिने चा सुळका” हा चढाईसाठी कठीण आणि २०० फूट खोल दरीवर ओव्हर हँग असल्याने हा सुळका  अजूनच भयंकर वाटतो. अश्या या पहिनेच्या सुळख्यावर कल्याणच्या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा आणि स्वराज्याची ओळख असलेला भगवा ध्वज फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंदन केले. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर दर वेळेस काहींना काही नवीन गिर्यारोहकांसाठी घेऊन येते. यावेळेस पहिने मोहिमेला लहान बालकांनी सुद्धा उपस्थिती लावल्याने बालदिनाचे महत्त्व लहानग्यांसाठी अजून विशेष झाले असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.

या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लक्ष्मणपाडा येथून झाली. सुरुवातीचा टप्पा शेतलागत असणाऱ्या बांधाने जात एक छोटा ओढा पार करावा लागतो. येथूनच घनदाट जंगलातील खड्या चढाईत मार्ग पहिनेच्या सुळक्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. सुळका आरोहणसाठी सुमारे एक तास लागतो. खडकांच्या खाच्यांमध्ये हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून चिकाटीने आरोहण करावे लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा आहे. सुळक्याचा खडक काही ठिकाणी सैल व निसरडा असल्याने जपून आरोहण करावे लागते, असा अनुभव सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर च्या गिर्यारोहकांनी सांगितला.       

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि काळजाचे ठोके चुकविणारा सुळक्याचा खडतर निसरडा मार्ग आणि बाजूलाच असलेली खोल दरी, हुडहुडी भरवणारी थंडी, शेवाळलेले गवत, कातळकडे,एक चुकीचे पाऊल म्हणजे खोल दरीतच विश्रांती असल्याने चुकीला माफी नाहीच,असे हे ठिकाण. अश्या सर्व आव्हानाला  सामोरे जात सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, अक्षय जमदरे, सागर डोहळेयांच्या  मार्गदर्शनाखाली नितेश पाटील, लतीकेश कदम, सुनील खनसे आणि इतर उपस्थित सभासदांनी ही मोहीम पूर्ण केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web