कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली/प्रतिनिधी – पिकांचे स्थानिक वाण, संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी पुरस्कार’ आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेला  प्रदान करण्यात आला. यासह या संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना ‘प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कृषी मंत्रालयातंर्गत येणाऱ्‍या प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हेरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी  (PPV & FRA)यांच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान येथे ‘राष्ट्रीय जीनोम सेव्हीयर कम्युनिटी’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण खंडू डगळे , संस्थेचे सदस्य बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे, अन्नमाता ममताबाई देवराम भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता  तज्ञ संजय पाटील , विभाग प्रमुख जितीन साठे , प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार स्वीकारला.

स्थानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांच्या  आर्थिक सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सध्या तालुक्यात राबविला जात आहे.  अकोले तालुक्यात बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धि व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे.

वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे 114 वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे. या भागातील खास वैशिष्ट्य असलेला काळ भात रायभोग , कोळपी या भात वाणांचा त्यात समावेश होतो . या भागातील खास वैशिष्ट्य असलेल्या कडू व गोड वाल , हिरवा लाल घेवडा , वाटाणा घेवडा तसेच वरई  पिकाच्या  घोशी आणि दुध मोगरा या वाणांचे संवर्धन केलेले आहे. मुबलक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असलेल्या हुलग्याच्या वाणांचाही यामधे  समावेश होतो . भात ,  वाल हरभरा , वाटाणा या पिकांच्या सुमारे नऊ स्थानिक वाणांचे  25 मेट्रिक टन बियाणे गेल्या हंगामात या संस्थेने निर्माण करून त्याचे वितरण केले आहे.

पारंपरिक बियाणे वापरून तयार होणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देताना गेल्या हंगामात सुमारे दहा टन तांदूळ विक्री संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. सात्विक आणि परिपूर्ण आहार प्रत्येकाच्या घरी मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून परस बागांसाठी बियाणे निर्मिती केली जाते. या बियांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.गेल्या हंगामात सुमारे 18 हजार आठशे परसबाग बियाणे संच विक्री करण्यात आलेले आहेत.

संस्थेच्या माध्यमाने आदिवासीबहुल गावांमध्ये जाणीव जागृती करून स्थानिक जैवविविधता जपण्यावर भर दिला जातो. संस्थेच्या माध्यमाने कोंभाळणें , एकदरे , देवगाव या गावांमध्ये गावरान बियाण्यांच्या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. या बीज बँकांमधून विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींचे बियाणे संवर्धित करून स्थानिक शेतकऱ्यांमार्फत पारंपारिक बियाण्यांचा वापर करून शेती पिकवण्यवर भर दिला जातो. संस्थेमार्फत तालुक्यातील  सुमारे 30 ते 35 गावांमध्ये स्थानिक जैव विविधता ठेवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या भागातील प्रमुख पिके भात , नागली , वरई , यासह भाजीपाला पिके, तेलबिया , तृण  आणि गळीत धान्य यासह रानभाज्या , कंदमुळे यांचेही संवर्धनावर भर दिला जात आहे .संस्थेमार्फत परसबागेत लागवड करण्यासाठी लागणाऱ्या विविध भाजीपाला  पिकांच्या बियांची निर्मिती व वितरण केले जाते . त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून बीज उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण  व सहकार्य ही केले जाते .

ममताबाई भांगरे यांनाप्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मानपुरस्कार

कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या सदस्या ममताबाई भांगरे यांना ‘प्लान्ट जिनोम सेव्हीयर शेतकरी सन्मान’ पुरस्काराने केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. जंगली अन्न वनस्पती, सेंद्रीय शेती आणि विविध पिकांच्या 68 स्थानिक वाण संवर्धन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web