बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिपादन

नाशिक/प्रतिनिधी – बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी  विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज पळसे येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार हेमंत गोडसे,आमदार, सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक, आत्मा राजेंद्र निकम, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ, कृषी उपसंचालक, कैलास शिरसाठ, अध्यक्ष सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, विलास शिंदे,  सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, विष्णूपंत गायखे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, गटशेतीच्या माध्यमातून आज गोडवा गुळ निर्मिती प्रकल्प उदयास आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहचणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सेंद्रीय शेती व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या सहकार्याने तरूण शेतकरी  हे नक्कीच कारखानदार होतील यात शंका नाही.  जुन्या काळचे तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून निर्मिती झालेला गुळ निर्मिती प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रसायन विरहित शुध्द गुळ ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, शासनाकडून शेतकऱ्यांच्या  सबलीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यात विकेल ते पिकेल या योजनेद्वारे ज्या वाणास जास्त मागणी आहे त्या वाणाचे पीक शेतकरी आपल्या शेतात घेण्यासाठी कृषि विभागामार्फत प्रोत्साहित केले जात आहे. त्यांनी उत्पादीत केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी बाजरपेठही उपलब्ध करून दिली जाते. महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने 30 टक्के योजना या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कृषि विभागाच्या माध्यमातून  शेतात तयार झालेला माल  एक्सपोर्ट, ग्रेडींग व पॅकींग करणे यासाठी  शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी  कृषि विभागाच्या तीनशे अधिकाऱ्यांवर राज्यात ही जबाबदरी सोपविण्यात आली आहे. या सर्वांचा शेतकरी व महिला शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही कृषिमंत्री दादाजी  भुसे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना केले.

तत्पूर्वी पळसे ग्रामपंचायत कार्यालय आवरात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत जनुसविधा आणि जिल्हा परिषद सेसनिधी अंतर्गत एकूण 95 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यात प्रामुख्याने सोमय्यानगर रस्ता काँक्रीटीकरण, , मागसवर्ग वस्ती भुमिगट गटार योजना, देवीरस्ता पथदिप, दारणा संकुल आदिवासी कुंपन, गवंदे मळा रस्ता खडीकरण, कारखाना शाळा कुंपन या कामांचे भुमिपूजन तर ग्रामपंचायत सी सी टिव्ही कॅमेराचे लोकार्पण कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

  1. अशोक टिळे (गहू पीकाचे हेक्टरी 62.0 क्किंटल उत्पादन, तालुकास्तर विजेते- पीकस्पर्धा)
  2. विश्वास कळमकर (चायनिज भाजीपाला उत्पादन व विक्री यासाठी. ब्रोकली, लिपसम व इतर प्रकार),
  3. शिवाजी म्हस्के ( गहू पीकाचे हेक्टरी 47.66 क्किंटल उत्पादन, तालुकास्तर विजेते- पीकस्पर्धा),
  1. प्रताप गायधनी ( ॲग्रो स्पार्कलर्स शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून दुध संकलन केंद्र व प्रक्रिया, दुग्धउत्पादन व प्रक्रिया उद्योगाचे शासकीय प्रशिक्षण देण्यात आले)
  2. रमेश गायधनी ( भाजीपाला शेडनेट हाऊस ),
  3. दिलीप गायधनी ( शेडनेट व अंडी उत्पादन),
  4. ॲड शरद गायधनी ( वसुदिप ॲग्रो फामर्स कंपनीच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक भाजीपाला केंद्र)

आदिंचा सत्कार झाला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web