चांगला सण आहे आम्हाला आमचे तोंड कडू करायचे नाही मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला टोला

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे– दिवाळीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा हा मनसेतर्फे विद्युत रोषणाईचा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीच्या फडके रोडवरील अप्पा दातार चौकात आयोजित करण्यात आला होता. मनसे नेते तथा आमदार राजू पाटील यांच्याहस्ते स्विच दाबून या परिसरातील विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि नोटीस देऊन फौजदारी कारवाई करण्याचे बजावले. या नोटिसला उत्तर देताना आमदार राजू पाटील यांनी उपरोक्त विधान केले. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या माध्यमातून दिवाळी पहाटच्या कार्यक्रमालाही परवानगी नाकारली. कोरोच्या वाईट काळात लोकांना दिलासा मिळेल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. मात्र सरकारच गोंधळले आहे. सर्व ओपन झाले आहे, त्यामुळे लोकांना फिरूद्या ना, असेही आवाहन आमदार राजू पाटील यांनी यावेळी बोलताना केले

दिवाळी सण सर्वांचा आहे. कोणत्या एकट्या पक्षाचा नाही. पोलिसांनी 149 ची आम्हाला नोटीस पाठवली, हा दोष आम्ही पोलिस प्रशासनाला देत नाही. सत्ताधारी उठसूट आदेश देत असतात. स्वतःची रेषा मोठी करा, दुसऱ्याची रेषा लहान करून काय मिळणार, असा सवाल करत आमदार राजू पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांपैकी कुणाचेही नाव न घेता सल्ला दिला. सणात आम्हाला गोडवा आणायचाय, त्यामुळे आम्ही आमचे तोंड कडू करणार नसल्याचेही ते म्हणाले.

तर कोरोनामुळे डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या फडके रोडची ‘रया’ लयास गेली होती. मात्र मनसेच्या या दिपोत्सवाने कोरोनामूळे आलेली ही काजळी आणि पूर्वीचा डौल प्राप्त होण्याचा श्रीगणेशा झालेला पाहायला मिळाला. आणि या नयनरम्य अशा उपक्रमाची आठवण मोबाईलच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये साचवण्यासाठी झाली नसती तर नवल. तरुण वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील डोंबिवलीकर हा अद्भुत आणि नेत्रदीपक सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात व्यस्त असल्याचे यावेळी दिसून आले.

गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आपल्याला सणही व्यवस्थित साजरे करता येत नव्हते. फडके रोड आणि आप्पा दातार चौक याठिकाणी दिवाळी काळात तरूणाईची लाट येते. डोंबिवलीसाठी या फडके रोडचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे महत्व असून यंदा कोणत्याही संस्थेतर्फे याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर आम्ही पुढाकार घेऊन मनसेतर्फे हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


      .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web