चोरीच्या मीटरमधून वीजचोरी,फसवणूक व वीजचोरीचा गुन्हा दाखल

पालघर/प्रतिनिधी – व्यावसायिक गाळ्याबाहेर लावलेले वीजमीटर चोरून त्याचा वापर निवासी व व्यावसायिक गाळ्यांमध्ये वीजचोरी करण्यासाठी होत असल्याची घटना बोईसर एमआयडीसी उपविभागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनू हृदयानंद पांडे (रा. बोईसर, जि. पालघर) याच्याविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अवधनगर येथील शेख कंपाऊंडमध्ये थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी करत असताना उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, सहायक अभियंता राहुल पाचपांडे व वरिष्ठ तंत्रज्ञ तुषार जोशी यांना हा प्रकार निदर्शनास आला. थकीत रकमेचा पूर्ण भरणा करून विनंती अर्ज केल्यानंतर इबरार अलीबहादूर खान यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्ष पाहणीत त्यांचा वीज पुरवठा सुरु असल्याचे आढळून आले. अधिक तपासणी केली असता खान यांच्याशिवाय शेख कंपाऊंडमधील दुमजली इमारतीत असलेल्या 11 खोल्यांना एकाच मीटरमधून वीजपुरवठा सुरु असल्याचे निदर्शनास आले. मूळ ग्राहक राजेश उत्तम गुप्ता यांच्या व्दिवेदी कंपाऊंड येथील फरीहा अपार्टमेंटमधील दुकानाबाहेरून मार्च 2021 मध्ये चोरीला गेलेले हे मीटर असल्याचे चौकशीत आढळले. आरोपी सोनू पांडे याने राजेश गुप्ता यांचे मीटर चोरून सदर मीटर शेख कंपाऊंडमध्ये अनधिकृतपणे बसवले व 74 हजार 880 रुपयांची वीजचोरी केली. तसेच वीज जोडणीच्या नावाखाली शेख कंपाऊंडमधील रहिवाश्यांकडून आरोपी पांडे याने पैशे घेतल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पांडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 420 आणि वीज कायदा 2003 च्या कलम 135, 136 व 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web