डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – मानपाडा पोलिसांनी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या 5 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 11 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. तर या कारवाईत तब्बल 4 लाख 40 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
शुभम संजू बोरडे (20, रा. भिमनगर झोपडपट्टी, टाटा पॉवर, कल्याण-पूर्व), आकाश प्रल्हाद पोले (21, रा. गोविंदवाडी, कल्याण-पूर्व) आकाश प्रकाश शर्मा (19, रा. समतानगर झोपडपट्टी, टाटा पॉवर, कल्याण-पूर्व) रफीक सलीम शेख (25, रा. नांदीवली गांव, कल्याण-पूर्व) आणि मोहीन मुक्तार अहमद (31, रा. नांदीवली, कल्याण-पूर्व)अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या पाचही गुन्हेगारांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याणच्या ग्रामीण पट्ट्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, वाहनांच्या चोऱ्या आणि नागरिकांना फसविण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अनिल भिसे, हवा. सुधीर कदम, भानुदास काटकर, पोना संजू मासाळ, पोना अनिल घुगे, पोशि ताराचंद सोनवणे या पथकाने तब्बल 4 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन 5 अट्टल आरोपींना अटक केली.
या आरोपींकडून 10 हजारांची रोकड, सोन्याची चेन, मोबाईल, 3 दुचाक्या, 3 रिक्षा, 58 हजार रुपये किंमतीचे 12 अमेरिकन डॉलर हस्तगत करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.