कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

मुंबई/प्रतिनिधी – कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योग, मस्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. माता-पित्याचे छत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राहुल नार्वेकर, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बिडवई यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री शेख म्हणाले, कोविड काळाने आपल्यातील अनेकांना हिरावून नेले. आज आठ मुलांना पाच लाख रुपयांची मुदत ठेव त्यांच्या नावे ठेवून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्य शासन अशा छत्र गमावलेल्या मुलांच्या शिक्षण आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या प्रक्रियेत निश्चितपणे त्यांच्या समवेत असणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि प्रशासन कायम त्यांच्या पाठीशी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.आमदार नार्वेकर म्हणाले, खऱ्या अर्थाने या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कायम या मुलांच्या पाठीशी राहू, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणाले, जिल्हास्तरीय कृति दलाच्या माध्यमातून दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे एकल पालक गमावलेली मुले, पती गमावलेल्या महिला या सर्वांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यांनाही राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलार यांनी केले. या कार्यक्रमास छत्र हरविलेल्या मुलांचे जवळचे नातेवाईक, बालकल्याण समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शेलार, जिल्हा परिविक्षा अधिकारी  पी. व्ही शिनगारे, परिविक्षा अधिकारी स्नेहा जोशी,  विधी सल्लागार श्रीमती सविता ठोसर यांच्यासह जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मुंबई शहर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web