केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२० मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

मुंबई/प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे अकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

अकादमीला 21 वर्षेही पूर्ण झाल्याबद्धल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात किंवा देशात कुठेही गेलात तरी सर्वोत्तम काम करून आपापल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नावही मोठे करा.आम्ही रस्त्यावर उतरणारे राजकारणी आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर कोणतीही चुकीची फाईल माझ्यासमोर आली नाही पाहिजे, असे ठामपणे सांगितले होते.

आपण नशीबवान आहात कारण एका कुठल्यातरी परीक्षेला सामोरे जात असता, आपल्या मुलाखती घेणारे निवडक तज्‍ज्ञ असतात. आम्हा राजकारण्यांना वारंवार वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागते. आम्हाला हजारो, लाखो लोक गुण देत असतात, आमच्या मुलाखती घेत असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.आत्मविश्वास असेल तर कुठलेही आव्हान पेलू शकतो असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे असा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, दुरितांचे तिमीर मोठे आहे, विविध संकटाना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक, कायदा सुव्यवस्था यांचे प्रश्न येतात, या सर्वांतून आत्मविश्वासाने मार्ग काढणे आवश्यक आहे.सत्तेवर आल्यानंतर कोरोनाचे संकट आले परंतु शासन आणि प्रशासनाने एकत्रितरित्या समन्वयाने काम केल्याने ही साथ नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरले असेही मुख्यमंत्री म्हणाले.

असा गौरव होणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमचे कौतुक केले अशा शब्दांत गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच आपण प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या यशाविषयी थोडक्यात सांगितले. संपूर्ण भारतातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या बिहारच्या शुभम कुमार, तिसरा क्रमांक मिळविलेल्या आणि सद्या मुंबईत नियुक्त असलेल्या अंकिता जैन, चौथा क्रमांक मिळविलेल्या यश जलुका, चौदावा क्रमांक मिळविलेल्या मुंबई स्थित करिश्मा नायर, राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या मृणाली जोशी, या परीक्षेत ३७ वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळविलेल्या विनायक नरवडे, ४९ वा क्रमांक मिळविलेल्या मुंबईतील रजत उभयकर, ९५ वा क्रमांक मिळविलेल्या लातूरच्या विनायक महामुनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web