एनएचएआय आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार

नागपूर/प्रतिनिधी – नागपूर हे देशात रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीमुळे जोडले असल्यामुळे हे शहर  लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता ठेवते. लगतच्या वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्ट अंतर्गत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंटेनरनिर्मितीसह लॉजिस्टिक व्यवसाय वृध्दींगत होवून मालवाहतुकीवरचा खर्च कमी होणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

हॉटेल सेंटर पॉईंट येथे जेएनपीटी व राष्ट्रीय महामार्ग रसद व्यवस्थापन यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार रामदास तडस, वर्धा जि.प. अध्यक्षा सरिता गाखरे, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौड, संचालक के. सत्यनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रिचा खरे आदी यावेळी उपस्थित होते.

सिंधी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील 35 मल्टी मॉडेल पार्कपैकी नागपूर हे महत्वपूर्ण असून येथे स्थापन होणाऱ्या विविध उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा उभारण्यात आली असून त्यासोबत जेएनपीटी काम करणार आहे. त्यामुळे येथून देशभरात‍ निर्यातीवर होणारा वाहतूक खर्च कमी होईल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग या मल्टी मॉडेल पार्कला जोडला आहे. तसेच शीतगृह कंटेनरची याठिकाणी व्यवस्था असल्यामुळे निर्यातयोग्य शेतमाल व फळांची नासाडी होणार नाही. परिणामी वाहतूक खर्चात बचत होईल. विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघु उद्योग असो.,चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी यावर परिसंवाद घ्यावा. येथे राज्य शासनाने  औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे, असे सांगून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ- सीकॉम यांच्या  माध्यमातून  सिंधीला स्मार्ट बनवून स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबात नियोजन करावे. पूर्व विदर्भात मत्स्यशेतीला वाव असल्यामुळे निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. विदर्भात संत्रा उत्पादकांनाही याचा फायदा होईल, असे मंत्री गडकरी म्हणाले.

या मल्टी मोडल लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वर्धा जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्वाकांक्षी असून त्याच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही श्री. केदार यांनी दिली. हा प्रकल्प उभारण्यासाठी सिंधी येथील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देण्यात यावा. या ठिकाणी कंटेनर निर्मिती, वाहतूक व्यवस्थापन व त्यानुषंगाने उद्योग-व्यवसायांना चालना मिळणार असून जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे मंत्री केदार यांनी यावेळी सांगितले.

सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा येथे स्थानिक शेतकऱ्यांना होईल, असे खासदार तडस यांनी सांगितले.जेएनपीटीचे अध्यक्ष सेठी, संचालक के. सत्यनाथन, संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग यांनी प्रकल्पासंबंधी आणि होणाऱ्या खर्चाबाबत यावेळी माहिती दिली.  

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web