कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रकल्पाचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते भूमीपूजन

नागूपर/प्रतिनिधी – टेलरींग काम ते कोट्यवधीच्या उद्योगाचे यशस्वी वहन करणाऱ्या डॉ. कल्पना सरोज यांना बेरोजगारीचे चटके माहित आहे. त्यामुळे विमान इंजन दुरुस्तीच्या त्यांच्या कोट्यवधीच्या प्रकल्पातून विदर्भातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळेल. सोबतच प्रतिकूल परिस्थितीत उद्योग, व्यवसायात कसे उभे राहायचे याची प्रेरणाही मिळेल, त्यामुळे कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रा. लि. प्रकल्पाचे भुमीपूजन करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.मिहान येथील परिसरात उभारण्यात येणाऱ्या कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रकल्पाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्पाच्या संचालिका डॉ. कल्पना सरोज, मिहान सेझचे विकास आयुक्त डॉ. व्ही. श्रमण, कॅप्टन विनय बांबूळे, व्यवस्थापकीय संचालक एम. के. गोरे यांच्यासह विमानचालन क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.

डॉ. राऊत म्हणाले की, मिहान सेझ हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून याठिकाणी विविध उद्योग, व्यवसायांच्या उभारणीतून विदर्भातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. नवनवीन उद्योग, व्यवसायांच्या उभारणीमुळे प्रदेशाच्या सर्वांगिण विकासात भर पडत आहे. कल्पना सरोज यांच्या एव्हीऐशन प्रकल्प अंतर्गत जेट विमान, हेलीकॉप्टर यांच्या इंजन दुरुस्ती, देखभालसह विविध सुटे भाग उभारणीचे व दुरुस्तीचे आणि पायलट प्रशिक्षण आदी महत्वपूर्ण कामे होईल. एव्हिऐशन प्रकल्प निर्मितीमुळे मिहानमध्ये विमानचालन या क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होणार असून रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होणार आहे. कल्पना सरोज यांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लाखो-करोडो महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या पद्मश्री पुरस्कारविजेत्या विदर्भातील प्रसिद्ध उद्योजिका डॉ. कल्पना सरोज यांना नुकतेच वनराई फाउंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले. कल्पना सरोज यांची यशोगाथा ही संघर्षमय व तेवढीच प्रेरणादायी आहे. तरुण उद्योजकांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी यावेळी केले.

श्रीमती सरोज यांनी आपल्या यशप्राप्ती विषयी कथन केले. त्या म्हणाल्या की, महिला उद्योजकांना अडचणींमुळे घाबरून न जाता जिद्दीने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगून हिंमतीने आयुष्याला सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले.डॉ. सरोज म्हणाल्या, एका बंद पडलेल्या कंपनीला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले. या कंपनीत साडेतीन हजार कामगार, 140 न्यायालयीन खटले आणि पाच बँकांचे 116 कोटींचे कर्ज, अशा विपरित परिस्थितीत कामगारांच्या मदतीने अवघ्या काही वर्षांत तोट्यातील कंपनीला नफ्यात आणले. यशाचे शिखर गाठायचे असेल तर जिद्द, चिकाटी व समर्पणासोबतच स्वतःवर विश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मिहान (मल्टी मोडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ) येथे विमानचालन या क्षेत्रात एमआरओ (विमानाची दुरुस्ती व देखभाल) उभारताना माझी जडणघडण झालेल्या क्षेत्रामध्ये उद्योग उभारल्या जात असल्याचा आनंद आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील बेरोजगारी न्याय तसेच नव्या क्षेत्रातील संधी उपलब्ध करुन देता येणार आहे. विदर्भामध्ये काम करण्याचा वेगळा आनंद असून आज एका छोटेखानी कार्यक्रमातून आम्ही याची सुरुवात केली आहे. भविष्यातही विदर्भासाठी यापेक्षाही भव्य करण्याची ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. विमानचालन क्षेत्रातील दिर्घ अनुभव असणारे कॅप्टन विनय बांबूळे व व्यवस्थापकीय संचालक गोरे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web