‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या ऑक्टोबर महिन्यातील ‘महापर्यटन, संधी, सुविधा आणि प्रबोधन शताब्दी वर्ष विशेष’ या अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या हस्ते आज झाले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, संचालक (प्रशासन) गणेश रामदासी आदी उपस्थित होते.

राज्य शासन पर्यटन विकासासाठी अनेक धोरणे राबवित असून त्यातून रोजगार वाढीसाठीही खूप मोठी मदत मिळणार आहे. स्थानिकांना त्याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी कशा पद्धतीने पुढे येत आहे. याबाबत या अंकात विशेष लेखांचे समायोजन केले आहे. त्यासोबतच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या क्रांतिकारक विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यातून सामाजिक घुसळण निर्माण करण्यासाठी ‘प्रबोधन’ हे नियतकालिक चालवले. ‘प्रबोधन’चे हे शताब्दी वर्ष असून यानिमित्त एक स्वतंत्र विभाग या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.

याशिवाय मंत्रिमंडळात ठरले, महत्त्वाच्या घडामोडी ही सदरे आणि कोविडसंदर्भात राज्य शासन राबवत असलेल्या उपाययोजनांचा समावेश या अंकात केला आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/?p=50779 या लिंकवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web