मालेगाव/प्रतिनिधी – कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कांदाचाळ उभारणी हाती घेणे गरजेचे असून यासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. असे आश्वासन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, मनोहर बच्छाव, प्रमोद निकम, निळकंठ निकम, भावना निकम, संगमनेर येथील प्रगतिशील शेतकरी आशिष वाकचौरे यांच्यासह विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुसे म्हणाले शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तालुक्यांतील पिक पध्दती समोर ठेवून त्यास शासकीय योजनांची सांगड घालावी. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव सादर करावेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांसह महिला शेतकऱ्यांना समोर ठेवून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी पुर्व तयारी करत मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन कृषी योजनांचा लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले.