कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.
कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार केरळीय समाज संचलित मॉडेल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला. वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. यावेळी प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर, उप प्राचार्य डॉ कला श्रीनिवासन, पर्यवेक्षिका निशा पिल्ले, विज्ञान शाखा प्रमुख शौमैन गोस्वामी आदींसह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.