शेतकरी बांधवांना सातबाऱ्याची डिजिटल प्रत विनामूल्य व घरपोच

अमरावती/प्रतिनिधी – शासनाने संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात खातेदारांना विनामूल्य व घरपोच दिला जात आहे. गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य व गांधी जयंतीचा मुहूर्त  शेतकरी बांधवांना डिजिटल सातबारा विनामूल्य व घरपोच देण्यासाठी विशेष मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. मौजे देवरा व देवरी येथील काही शेतकरी बांधवांना सातबारा वाटप प्रातिनिधिक स्वरूपात झाले. आमदार बळवंतराव वानखडे, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  गाव नमुना क्र. 7/12 अधिकार अभिलेखपत्रक महसूल विभागाकडून अद्ययावत करण्यात आले असून, 7/12 चा उतारा सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा व बिनचूक करण्यात आलेला आहे. या मोहिमेत सातबा-याच्या प्रती तलाठ्यांमार्फत खातेदारांना विनामूल्य व घरपोच देण्यात येणार आहेत.  विशेष मोहिमेद्वारे गावोगावी प्रत्येक खातेदारापर्यंत पोहोचून सातबारा वाटप व्हावे. त्याचप्रमाणे, सातबा-यात काही दुरुस्ती आवश्यक असल्यास  फीडबॅक फॉर्ममध्ये शेतकरी बांधवांकडून नोंद करून घ्यावी, तसेच त्यांना आवश्यक दुरुस्त्या तत्काळ करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

उपजिल्हाधिकारी श्री. भोसले म्हणाले की, सर्व तहसीलदारांना मोहिमेचे अचूक नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. गांधीजयंतीनिमित्त होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये खाते उताऱ्याचे वाचन करण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web