महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर

मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील 4534 उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.

विविध न्यायालयीन प्रक्रियेत हा निकाल प्रदीर्घ काळ अडकला होता. या विषयावर  विविध बैठका घेऊन व कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा सूचना मागील आठवड्यात दिल्या होत्या. यामुळे दीर्घकाळापासून प्रतीक्षा करणाऱ्या विद्युत सहाय्यक पदांच्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे,” अशी भावना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केली.

महावितरण कंपनीतील विद्युत  सहाय्यक  पदांच्या एकूण 5000 पदांसाठी 9 जुलै  2019 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 466 जागा वगळता उर्वरित 4534 जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे.

यानुसार खुल्या प्रवर्गातून 1984 पदांचा तर अनुसूचित जातीसाठी 375, अनुसूचित जमातीसाठी 236, विमुक्त जातीसाठी 109, भटक्या जमाती(ब)साठी 80, भटक्या जमाती (क)साठी 118, भटक्या जमाती (ड)साठी 44, विशेष मागास प्रवर्गासाठी 81 व इतर मागास वर्गासाठी 1507 पदांचा निकाल जाहीर  करण्यात आला आहे.

दिनांक 5 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार व सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार विविध टप्प्यावर प्रलंबित असलेली  भरती प्रक्रिया राबविण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेवरी स्थगिती उठविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी महावितरण कंपनीची बाजू सक्षमपणे मांडण्याकरिता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web