कल्याण/संघर्ष गांगुर्डे – स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना सर्व माहिती असल्याचे खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेच्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांना दिले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वरुण देसाई कल्याणात आले होते.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी मनसेचे युवानेते अमित ठाकरेही कल्याण डोंबिवलीत फिरत आहेत. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनेला शुक्रवारी लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले अमित ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. त्यांच्या पक्षाचे काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास खरा करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सेनेचे नेते पदाधिकारी दिवस रात्र झटत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरती कोण काम करत आहे याबाबत लोकं समजूतदार असल्याचे सांगत वरुण सरदेसाई यांनी अमित ठाकरेंना प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले.
दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कल्याण डोंबिवलीत दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. शनिवारी कल्याण पूर्व- कल्याण पश्चिम तर रविवारी उल्हासनगर, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा आढावाही ते घेणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.