उल्हासनगर/प्रतिनिधी – थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला थकबाकीदाराच्या शेजाऱ्याने गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवारी उल्हासनगरमध्ये घडली. यासंदर्भात गुन्हा दाखल करून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला सोमवारीच अटक केली. तर न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित आरोपीची रवानगी मंगळवारी पोलिस कोठडीत झाली आहे.
विनोद नंदू साळवे (रमाबाई आंबेडकर नगर, उल्हासनगर नं.2) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बाळकृण कुबल (ओटी सेक्शन, रमाबाई आंबेडकर नगर) यांनी ७८ दिवसांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नव्हता. त्यामुळे तंत्रज्ञ सुनिल जाधव यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या उपस्थितीत कंत्राटी कर्मचारी मधु थोरात यांनी थकबाकीदार कुबल यांचे मीटर व सर्विस वायर काढली. कुबल यांच्या शेजारच्या साळवे यांनी मीटर का काढले याचा जाब विचारत कंत्राटी कर्मचारी थोरात यांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात टणक वस्तुने प्रहार केला. यात थोरात यांना गंभीर इजा होऊन ते रक्तबंबाळ झाले. यदांदर्भात तंत्रज्ञ जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा (कलम 353), सरकारी कर्मचाऱ्याला घाबरवण्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला करणे (कलम 332) शांतता भंग करण्यासाठी जाणिपूर्वक अपमान (कलम 504) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे.