गोविंदवाडी बायपास रस्ता रुंदीकरणात बाधितांच्या हक्काच्या घरांसाठी साखळी उपोषण

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुर्गाडी ते पत्री पूल या गोविंदवाडी बायपास रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांची घरे २००५ साली तोडण्यात आली आहेत. या नागरिकांना केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये ३२२ लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र मागील पंधरा वर्षात महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या नागरिकांना हक्काची घरे मिळालेली नाही. या नागरिकांच्या हक्कासाठी काँग्रेसचे कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांच्या वतीने आज साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसात नागरिकांना हक्काची घरे मिळाली नाही तर या नागरिकांना बीएसयुपी इमारतींमध्ये घुसून घरांचा ताबा घेऊन असा इशारा पालिका प्रशासनाला  दिला आहे.

रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांना तसेच शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीत केंद्र सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बीएसयूपी योजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या योजनेतून उभारण्यात आलेल्या घरांची दुरवस्था झाली आहे. इमारतीमधील बहुतांश सर्वच वस्तू चोरट्यांनी चोरून नेले आहे. जनतेच्या कररूपी पैशातून ही घरे उभारण्यात आलेली असताना त्यांच्या सुरक्षेबाबत पालिका प्रशासनाला कोणतेही देणेघेणे नसल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला. बाधितांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांच्यासह स्थानिक नागरिकांनी उपोषण छेडले आहे. या उपोषणाला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, माजी शिवसेना नगरसेवक कैलास शिंदे, समाजसेवक नरसिंग गायसमुद्रे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहुन पाठींबा देत नागरिकांना हक्काची घरे देण्याची मागणी केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web