विरार/प्रतिनिधी – वीजपुरवठा खंडित का केला याचा जाब विचारत विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात घुसून शाखा अभियंत्याला मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी (23 सप्टेंबर) घडली. यासंदर्भात विरार ग्रामीण पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित साळुंके, पूनम देसाई आणि एक अज्ञात व्यक्ती असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सहायक अभियंता राजकुमार कल्लोळकर गुरुवारी विरार ग्रामीण कक्ष कार्यालयात कर्तव्यावर होते. दैनंदिन कामकाज सुरू असताना तिन्ही आरोपींनी कार्यालयात घुसून वीजपुरवठा का खंडित केला याचा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. तर आरोपी अभिजित साळुंके याने कल्लोळकर यांना मारहाण केली. यात कल्लोळकर यांच्या नाकाला व कानाला जखमा झाल्या. कल्लोळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा (कलम 353), जाणीवपूर्वक दुखापत करणे (कलम 323) संगनमत करणे (कलम 34) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील वीज कर्मचाऱ्यांना दमदाटी, मारहाण हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी अपराध असून या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.