तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांना महावितरणचा झटका, वीजपुरवठा केला खंडित

कल्याण/संघर्ष गांगुर्डे –  कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२  हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २ लाख १  हजार ३२  वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत ५ हजार ४६५, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत ७  हजार ९७२, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४  आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५  हजार २५०  ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९  पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी १ लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३११ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ६ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web