कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी बाहय रुग्ण सेवा (ओपीडी) संध्याकाळी देखील सुरु राहणार आहे. गेली दिड वर्ष कोविड साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका अनेक उपायोजना राबवित आहे. आगामी कालावधीत कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता पाहता तसेच सदयस्थितीत साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा नागरिकांपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते. हि गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने व रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रुग्णांच्या घरालगतच्या नागरी आरोग्य केंद्रावर संध्याकाळी देख्रील बाहयरुग्ण सेवा(ओपीडी) उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार कल्याण मधील महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, चिकणघर नागरी आरोग्य केंद्र, मोहना नागरी आरोग्य केंद्र, कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र , तिसगाव नागरी आरोग्य केंद्र, खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे डोंबिवलीतील पाटकर,मढवी, दत्तनगर, महाराष्ट्र नगर या नागरी आरोग्य केंद्रांवर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत बाहयरुग्ण सेवा (ओपीडी) सुरु करण्यात येत आहे. डोंबिवली तील मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्र लवकरच नवीन मोठया जागेत स्थलांतरीत होत आहे. तद्नंतर तेथेही बाहयरुग्ण सेवा नागरिकांच्या सेवेकरीता सुरु करण्यात येणार आहे. तरी या सुविधेचा महापालिकेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्यामार्फत करण्यात आले आहे