मुंबईची लाईफलाईनची कमाल, ब्रेन डेड डोनरचे अवयव अवघ्या ६७मिनिटांत कल्याणहून मुंबईच्या रुग्णालयात दाखल

कल्याण/प्रतिनिधी = मुंबई लोकलला ‘मुंबईची लाईफलाईन’ अर्थातच जीवन वाहिनीही म्हटलं जातं. मुंबई लोकलने आपले हे ‘लाईफलाईन’ बिरुद पुन्हा एकदा सिद्ध केले. ब्रेन डेड झालेल्या डोनरचे अवयव अवघ्या 67 मिनिटांत कल्याणच्या रुग्णालयातून मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे पोहचवत मुंबई लोकलने आपले ‘लाईफ लाईन’ हे नाव सार्थक करून दाखवले आहे.

कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात असलेल्या ब्रेन डेड व्यक्तीने आपले किडनी आणि लिव्हर हे दोन्ही महत्वाचे अवयव दान केले. मुंबईच्या परळ येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तीला हे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार होते. मात्र रस्ते वाहतुकीला खड्डे आणि वाहतुक कोंडीचे लागलेले ग्रहण पाहता सध्या मुंबई लोकल ट्रेन हाच सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय असल्याचे दिसून आले. त्यामूळे संबंधित रुग्णालयाच्या टिमने कल्याण स्टेशनवर मुंबई लोकल पकडली आणि परळ स्टेशन गाठले. आणि तिकडून मग हे अवयव सुरक्षितरित्या परळमधील खासगी रुग्णालयात वेळेवर पोहचवण्यात आले. कल्याणातील रुग्णालय ते मुंबईतील रुग्णालय प्रवास अवघ्या 67 मिनिटांत पूर्ण करण्यात आला. यासाठी कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी, कर्मचारी, जीआरपी, आरपीएफ स्टाफनेही विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे काहीशी घडी विस्कटली असली तरी मुंबई लोकलने पुनः एकदा लाईफलाईन नावाला साजेसे काम करून आपल्याच शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे बोलले तर चुकीचे ठरणार नाही.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web