कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वीजग्राहकांकडे ३५६२ कोटी थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरण कडून आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) ५० लाख १९  हजार लघुदाब ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी ३ हजार ५६२ कोटी रुपयांवर पोहचली आहे. महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी केले आहे. तर वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्याचे निर्देश देतानाच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचा समावेश होतो. महावितरणच्या दरमहाच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणारा हा विभाग असून या विभागातील थकबाकीचा वाढता डोंगर महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचाऱ्यांचे पगार, वीज खरेदीसारख्या अत्यावश्यक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक सातत्याने मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते ते थेट कार्यकारी अभियंत्यांपर्यंत संवाद साधत वसुलीचा आढावा घेऊन आवश्यक निर्देश देत आहेत.

५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या २० लाख ७१ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडून (२ हजार ९०९ कोटी रुपये थकबाकी) वसुली करावी अथवा त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा निश्चित असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. तर विनंती व पाठपुरावा करून पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे चालू वीजबिल वसूल करावेत. याशिवाय चालू वीजबिलाचा भरणा करणाऱ्या कृषीपंप ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या कृषिपंप धोरण २०२०  योजनेचा लाभ देऊन थकबाकी वसुलीला चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वर्गवारीतील ४३ लाख २४ हजार घरगुती ग्राहकांकडे ७३९  कोटी, ५ लाख २३ हजार व्यावसायिक ग्राहकांकडे ३०६ कोटी, १ लाख ४ हजार औद्योगिक ग्राहकांकडे ३७२  कोटी, २३ हजार ६४९ पाणीपुरवठा योजनांकडे ४९८ कोटी तर ४४  हजार ७५४ पथदिवे जोडण्यांचे १  हजार ६४६ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. भांडूप परिमंडलात १० लाख ३२  हजार ६१२  ग्राहकांकडे ५३७ कोटी, कल्याण परिमंडलात १३ लाख ३ हजार ७१८ ग्राहकांकडे ५५३ कोटी, कोकण (रत्नागिरी) परिमंडलात ४ लाख ६२ हजार ६९५ ग्राहकांकडे १३६  कोटी, नाशिक परिमंडलात १२  लाख २४  हजार ३१९  ग्राहकांकडे ९९५  कोटी आणि जळगाव परिमंडलात ९ लाख ९६  हजार १७२  ग्राहकांकडे १  हजार ३४१  कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत‍ केला जात नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी अथवा इतराकडून वीज घणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास कायदेशिर व दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिल भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन सहव्यवस्थापकीस संचालक (प्र) रेशमे यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web